25 September 2020

News Flash

नातं तुटताना..

जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे, टिकून राहावे आणि वाढावे म्हणून आपण प्रयत्नशील असतो.

जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे, टिकून राहावे आणि वाढावे म्हणून आपण प्रयत्नशील असतो. मानवी जीवनाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. बऱ्याचदा नात्याने आपली ओळख निर्माण होते. प्रत्येक नात्यात ती ओळख घेऊन वावरताना आपल्याच व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा आपल्या प्रत्ययाला येतात. नात्यांच्या गोतावळ्यात शाश्वती आणि शांतता अनुभवणारे नात्याच्या अनिवार्यतेची ग्वाही देतील यात शंका नाही. परंतु एकलकोंडे राहण्याची आवड असणाऱ्यांनीही एक-दोन नाती जोडलेली असतातच. नात्याचे स्वरूप व त्यातली आत्मीयता व्यक्तीपरत्वे भिन्न असली तरी कोणतेही नाते हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असते. म्हणूनच रॉबिन्सन क्रुसोने इतके दिवस एकटय़ाने एका मानवविरहित बेटावर कसे काय काढले याचे आश्चर्य वाटते. मानवी जीवनात इतके मौलिक स्थान असणाऱ्या नात्यांचे बंध तुटताना किती मन:स्ताप होतो, दु:ख होते, हताश वाटते हे आपल्यापैकी प्रत्येकालाच पुरेपूर माहीत आहे.
नातं तुटलं तरी त्या नात्यातले सुंदर क्षण आणि आठवणींमुळे ते जिवंतच राहते. बऱ्याच वेळा नात्याचे Quality Testing हे नात्यात दुरावा निर्माण होऊ लागल्यावर केले जाते. Quality Testing म्हणजे नात्याचे स्वरूप, त्यात कुरबुरी का व्हायला लागल्या, दुरावा का निर्माण झाला, कोणाचे काय चुकले, इत्यादी. या गहन प्रश्नांची, त्यामागच्या कारणांची उकल होता होता नाते हातातून निसटत जाते आणि कधी कधी तर तो बंधही तुटतो. नावापुरते तोंडदेखले नाते उरले तरी मनोमन ताटातूट व्हायची ती होतेच. मग उरतो तो केवळ उपचार. काही वेळा तर तोही राहत नाही. काही नाती कागदोपत्री तुटतात. काही दोन व्यक्तींतील भौगोलिक अंतरानं तुटतात. काही गैरसमजातून, काही अती बोलण्यामुळे, तर काही कमी बोलण्याने. काही काळाच्या ओघात दुरावतात. तर काही ‘अतिपरिचयात अवज्ञा’ होऊन तुटतात. नाते तुटताना ते केवळ संबंधित व्यक्तींनाच नाही, तर त्या व्यक्तींशी जोडल्या गेलेल्या इतरांनाही दुरावते. नाते तुटण्याचे कारण काय, यावरही त्याच्या पडसादाची तीव्रता अवलंबून असते. कधी मालमत्ता, पैसा, वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी या कारणांमुळे नाती दुरावतात. तर कधी शोषण, मतभेद, मानापमान, स्वभावभिन्नता, विचारधारा, अहंकार, विकार, संघर्ष, भांडण, वादविवाद, नातलगाचा मृत्यू आदी कारणांमुळेही ती दुरावतात.
शोषणयुक्त नात्यातून बाहेर पडताना व्यक्ती निश्चितच स्वतंत्रतेचा, मोकळेपणाचा नि:श्वास सोडते आणि असे नाते तुटणे योग्यच. परंतु आपण चर्चा करतो आहोत ती अशा दुराव्याची- ज्याचा दाह नात्यातील दोन्ही बाजूंच्यांना किंवा एका बाजूच्या घटकाला तरी सतावत राहतो. नाते तुटण्यापर्यंत पोचण्याआधी प्रत्येकानेच आपल्या नात्याची उजळणी करावी. नियमितपणे नात्याच्या स्वास्थ्याचा आढावा घ्यावा. नात्यात काही त्रुटी आढळल्यास वेळीच त्याची डागडुजी करावी. गाडीला जशी वेळोवेळी देखभालीची गरज भासते तसेच नात्याचेही असते. नात्यात काय उत्तम चालले आहे, काय बदल अपेक्षित आहेत, माझी काय भूमिका अपेक्षित आहे, मी नात्यात शंभर टक्के सहभागी आहे का, आदी प्रश्नांची उत्तरे शोधावीत आणि योग्य ती दुरुस्ती करून नात्याचे हे गाडे पुढे न्यावे. बऱ्याचदा छोटय़ा छोटय़ा कुरबुरींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्यातून पुढे मोठे तंटे उद्भवतात आणि मग ते सोडवण्यासाठी कष्ट करावे लागतात. कधी कधी या सगळ्याला उशीर होतो आणि मग नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय (खरे तर नाइलाजाने) घेतला जातो. मथितार्थ हा, की आपण सजगपणे प्रयत्नशील राहिल्यास आणि वेळीच प्रतिबंधात्मक पावले उचलल्यास नाते तुटण्यापासून वाचू शकते. परंतु कधी कधी ताटातूट अपरिहार्य बनते. अशावेळी आपली मानसिकता कशी तयार करावी, हे इथे पाहू..
जेव्हा एखादे जिव्हाळ्याचे नाते अकस्मात तुटते तेव्हा आपल्याला दु:खाची, अपराधीपणाची, कधी रागाची, हताशेची भावना सतावत राहते. मुळात हे असे घडले आहे हे पचवणेच कठीण जाते. काल जे नाते होते, ते आज नाही आणि यापुढे ते कधी पुन्हा निर्माण होईल का, हेही माहीत नाही अशा काहीशा अशाश्वततेच्या भोवऱ्यात आपण अडकतो. कोणतेही नाते आपले जीवन प्रभावित करतेच; मग ते औटघटकेचे असो वा दीर्घकाळ खोलवर रुजलेले. मनात खोलवर रुजलेले नाते जेव्हा तुटते तेव्हा अतीव दु:ख होते. नाते तुटते आहे, ही जाणीव ते तुटत असतानाच आपल्याला होत असते. तेव्हा याची जबाबदारी स्वीकारून त्वरित बचावकार्य सुरू करावे. आपल्याला ते नाते महत्त्वाचे वाटत असेल तर दोषारोप करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सगळी सूत्रे हाती घेऊन संयमी आणि सक्रिय हस्तक्षेप करावा. ‘मला काही फरक पडत नाही’ असे म्हणून आपण आपले तथाकथित भावनिक सामथ्र्य दर्शवत आहोत असे वाटले तरी त्यात काही अर्थ नाही, हे वेळीच जाणावे. कारण फरक पडत नसता तर आपण इतका काळ त्या नात्यात राहिलो असतो का? त्यामुळे अशी दुराग्रही भूमिका टाळून त्वरित सुसंवाद साधावा. त्यासाठी स्वत:ला व समोरच्या व्यक्तीला विचार करण्यास पुरेसा वेळ घ्यावा.. द्यावा. नाते वाचवण्यासाठी जे पोषक आहे ते सर्व करावे. हे सारं आपण आपले नाते आणि आपली मन:स्थिती ठीक राहावी म्हणून करतो आहोत, त्यामुळे फुकाचा अहम् बाळगू नये, किंवा समोरच्यावर आपण उपकार करतो आहोत अशा आविर्भावातही राहू नये. म्हणजेच ‘मी हे करत आहे, कारण हे नाते मला महत्त्वाचे, जिव्हाळ्याचे आणि मौलिक वाटते’ या भूमिकेतूनच हे व्हावे. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही नाते टिकवण्यात आपल्याला अपयश आले तरी आपण प्रयत्न केले याचे समाधान तरी नक्कीच मिळेल आणि आपण अपराधीपणाच्या गंडातून स्वत:ला वाचवू शकू. नाते तुटतानाचा क्षण हा कटू असणार, मनाला डागण्या देत राहणार, परंतु त्या क्षणाच्या आधारे दीर्घकाळच्या नात्याचे परीक्षण करणे टाळावे. नात्याची Expiry Date उलटली, नाते संपले हे सत्य पचवणे माणसाला कठीण जाते. परंतु ते जितक्या लवकर आपण स्वीकारू, तितक्या लवकर आपण स्वत:ला सावरू शकू. आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचे काहीएक प्रयोजन असतेच. नाते तुटले तरीही त्या व्यक्तीबरोबर व्यतीत केलेले आनंदी, हसते-खेळते क्षण, तिच्याकडून शिकलेले आयुष्याचे धडे, त्या व्यक्तीकडे पाहून आपल्या व्यक्तित्वात केलेले सकारात्मक बदल, आपल्या अडचणीच्या काळात त्या व्यक्तीकडून झालेली मदत यांचा आढावा घ्यावा. नात्यात ज्या चुका घडल्या त्यातून बोध घ्यावा आणि इतर नात्यांमध्ये त्या कटाक्षाने टाळाव्यात. आपले नाते तुटल्याने आपल्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींनाही या संक्रमणातून पुढे सरकण्यास मदत करावी. त्यांच्याशी संवाद साधावा. आपले नाते तुटले म्हणून इतरांनीही ते तोडावे हे योग्य नव्हे. आपल्याशी जोडलेल्या अन्य व्यक्तींनी आपल्या निर्णयात आपल्याला साथ द्यावी ही अपेक्षा स्वाभाविक असली तरी त्यांनीही आपल्याबरोबरच त्या व्यक्तीशी नाते तोडावे हा आग्रह बाळगणे चुकीचे. एखाद्या व्यक्तीस जर ते नाते टिकवून ठेवायचे असेल (आपले तुटले असले तरी!) तर त्या व्यक्तीस ती मुभा आहे. अशा दुराग्रहामुळे आणखी एका नात्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. अशा प्रसंगी सर्व बाजूंनी विचार करून वस्तुनिष्ठ निर्णय घ्यावा. ‘माझे पटले नाही, म्हणून तुझे पटत असले तरीही केवळ आपले नाते टिकवायला तू ते नाते तोडून टाक,’ असे म्हणणे म्हणजे समोरच्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणे होय.
तसेच नाते तुटणे हे आपले वैयक्तिक अपयश आहे असा समज करून घेणेदेखील योग्य नाही. कारण आपल्याव्यतिरिक्त इतर घटक, परिस्थिती आणि प्रसंगही या घटनेस जबाबदार असू शकतात. नाते तुटले म्हणून त्या नात्यात गुंतलेल्या आठवणीही पुसून टाकणे कठीण असते. परंतु घातक आणि आपल्या प्रगतीत अडचण ठरणाऱ्या आठवणींचे स्मरण कसोशीने टाळावे.
नात्यातील प्रत्येक घटकाचा आदर ठेवून, कधी त्यांचा आधार बनून, तर कधी त्यांचा आधार घेऊन, वेळोवेळी एकमेकांना आरसा दाखवून, सक्रिय भूमिका पार पाडून, मनात वादळे निर्माण होऊन ती घोंगावण्यापेक्षा वेळीच ती शमवून नाते जपावे. ही भूमिका व विचारसरणीच योग्य आहे. परंतु कसोटी आहे ती सचोटीने, संयमाने आणि सहिष्णुतेने नाते जपण्याची.. आणि ते पोषक आहे की घातक, हे वेळीच ओळखून त्याचे दडपण न बाळगता योग्य तो निर्णय घेण्याची!
केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2016 1:01 am

Web Title: damaged or destroyed relationships
Next Stories
1 जोडी नं. १
2 चहाडय़ा आणि बरेच काही..
3 नात्यातले एकटेपण
Just Now!
X