28 February 2021

News Flash

असा मी.. असा‘च’ मी!

कधी मर्जीने, तर कधी सक्तीने. आणि त्या, त्या अनुषंगाने आपली भावस्थितीही बनत जाते.

कोणताही बदल म्हटला की सद्य:स्थितीत जे चालले आहे त्याला बगल देऊन नवे, वेगळे काहीतरी घडणे. त्याचे प्रमाण जसे भिन्न, तसे त्याचे परिणामही भिन्न. बदल हा निसर्गाचा नियम आहे. परंतु याच निसर्गाचा भाग असणाऱ्या व्यक्ती ‘बदल’ या प्रक्रियेकडेही भिन्न दृष्टिकोनातून पाहतात. कोणाला बदल सतत हवाहवासा वाटतो, तर कोणाला सतत होणारा बदल म्हणजे एक प्रकारची अशाश्वतता आणणारी बाब वाटत असल्याने तो नको असतो. दैनंदिन जीवनात आपण असंख्य वेळा या बदलाला सामोरे जातो. कधी मर्जीने, तर कधी सक्तीने. आणि त्या, त्या अनुषंगाने आपली भावस्थितीही बनत जाते. तीही स्वेच्छेने वा अनिच्छेने. एखादा बदल आपल्या आयुष्यात किती गरजेचा आहे, तो घडून आल्यास दैनंदिन जीवनाची घडी कितपत बसणार किंवा विस्कटणार आहे, काय होते ते आता नसणार आहे, आणि काय नव्हते ते आता असणार आहे, तसेच तो बदल कोणी, कसा, कशासाठी व कशाप्रकारे घडवून आणला आहे, आणि आयुष्याच्या नेमक्या कोणत्या घटकांवर त्याचा परिणाम होणार आहे.. यांसारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे कोणत्याही बदलास सामोरे जाताना आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना, तसा प्रयत्न नक्कीच करावा. असे अवलोकन केल्यास आपल्याला बदलाचा स्वीकार किंवा अस्वीकार करता येऊ शकतो. तसेच काही वेळा बदल अपरिहार्य आणि सक्तीचा असताना ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्यास बदलामागच्या सक्तीचा स्वीकार करतानाही मानसिक तणाव नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
एखादी गोष्ट अंगवळणी पडली, सवयीची झाली की एक प्रकारचा शाश्वत स्वरूपाचा ‘सोयीस्कर कक्ष’(comfort zone)- किंबहुना ‘कोष’ निर्माण होतो. तिथे काय, कसे, कधी, कितपत घडणार आहे याची साधारण कल्पना आपल्याला असते. किमान त्याबद्दल अंदाज तरी बांधता येत असतो. त्यामुळे या ‘कक्ष-कोषा’मध्ये आपण विसावतो, स्थिरावतो. परंतु याचा अंमल जास्त झाल्यास जेथे आपण पाय घट्ट रोवून उभे राहतो (असे आपल्याला वाटत असते) तेथेच पाय रुतत जातात आणि आपण अडकत जातो. ही प्रक्रिया बऱ्याचदा बघणाऱ्यांना कळत असते, पण रुतणाऱ्यांना ती जाणवत नाही. कारण या सोयीस्करवीरांना ते कोषात अडकले आहेत, हे मुळी माहीतच नसतं. त्यांच्यासाठी ही जीवनशैली सवयीची होते. या कोषात राहून आपली प्रगती खुंटते आहे हे आपणहून त्यांना कधी जाणवले, किंवा इतरांनी पटवून देऊन त्यांना ते पटले, तरीही या कोषाबाहेरचे विश्व त्यांना अतिभिन्न वाटते. त्यामुळे नवी आव्हाने, नवे अर्थ, नवे दृष्टिकोन यांच्या निव्वळ विचारानेसुद्धा त्यांना भीती वाटते. त्यांचा आत्मविश्वास डगमगतो. ही भीती व अनिश्चितता त्यांना बदल स्वीकारण्यापासून दूर लोटते. त्यांच्यासाठी ‘बदल’ या शब्दाची आणि प्रक्रियेची परिभाषा म्हणजे- ‘ब’- बरेच काही, ‘द’- दमछाक करणारे, दडपण निर्माण करणारे, तर ‘ल’- लयास नेणारे!
परिस्थितीतील बदल आपल्या नियंत्रणात कितपत असतील हे कोणालाही सांगणे कठीण. त्यामुळे स्वत:च्या व्यक्तित्वाच्या संबंधित बदलांवरच लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल.
बदल गरजेचा आहे याची जाणीव असणे आणि तशी प्रेरणा असणे या दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत. परंतु बदल घडवून आणायला त्या पुरेशा नक्कीच नाहीत. त्या बदलात आपली काहीतरी सक्रिय भूमिका असणार आहे आणि तो बदल घडवून आणायला आपल्याला काहीतरी ठोस स्वरूपाचे करावे लागणार आहे, ही जाणीव आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीही महत्त्वाचीच. कारण नुसते ‘म्हणणे’ म्हणजे कळतंय, पण वळत नाही; आणि वळावे अशी इच्छाही नाही. तसेच ते न वळावे यासाठीच खास प्रयत्न आणि आडमुठेपणा- अशी काहीशी गत. याशिवाय आपण घडवून आणलेला बदल हा इतर लोक कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात याबाबतची चिंताही काहींना वाटत असल्यानेही बऱ्याचदा बदल नाकारला जातो. आता बदल घडवून आणायचा आहे किंवा तो आपसूक घडणार आहे, या विचाराने आपण भूतकाळात शिरतो. झालेल्या चुका, घेतलेले चुकीचे निर्णय, केलेल्या चुकीच्या निवडी, संगत याचे वाईट वाटत राहते. हे विचार आपल्याला बदल घडवून आणण्यापासून तो स्वीकारण्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. परंतु या अधोगतीला नेऊ पाहणाऱ्या विचारांची संगत जडली तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे बदल स्वीकारण्याची प्रक्रिया सुरुवातीला जरी खडतर वाटत असली आणि ती वास्तविकरीत्याही खडतर असली, तरीही पावले उचलून पुढे सरसावल्यास आपण बदल न स्वीकारण्याच्या मानसिकतेतून निश्चितच बाहेर पडू शकू. अन्यथा आपण सवयीप्रमाणे स्वत:चा बचाव करण्यासाठी इतरानांच दोष देत राहू. आपण कसे चुकलो नाही, हे सतत पटवून देत राहू. तसेच दुसऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून आपण नामानिराळे होऊ. या सर्वाचा शेवट हाच, की आपण जिथे होतो तिथेच घुटमळत, रेंगाळत, रुतत राहू. याच्या उलट कधी कधी आपण शरमेने इतके खालावतो, की सगळा दोष स्वत:कडे घेऊन, स्वत:वर टीकास्त्र सोडून कुस्थितीची जबाबदारी गरजेपेक्षा जास्त स्वत:च्या माथी मारून घेत असतो.
ही दोन टोके आणि यात लोंबकळणारे आपण! एकीकडे गेलो काय वा दुसरे टोक धरले काय; शेवटी बदल स्वीकारायचा राहूनच जाईल. दृष्टिकोन, विचारसरणी, निर्णय, भावस्थिती यांच्यातील बदल आपण स्वीकारला नाही तर भूतकाळातून शिकणे, नवी उमेद, ऊर्जा मिळवणे आणि नवी आव्हाने यशस्वीरीत्या पेलणे तसेच नव्या रूपातील अस्तित्व अनुभवणे या बाबी दुरापास्त होऊन जातील.
स्वत:मध्ये एखादा बदल घडवून आणताना आपला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन त्यात सुयोग्य मदतनीस ठरतो. त्यामुळे ‘बदलाची जाणीव झाली म्हणजे बदल झाल्यातच जमा!’ ही धारणा उपयोगाची नाही. कोणत्याही घटनेला टीकेच्या स्वरात आळवण्यापेक्षा त्यातून काय बोध मिळेल ते पाहणे गरजेचे आहे. अशावेळी बदल रोखल्यास वा घडू दिल्यास किंवा घडवून आणल्यास काय सकारात्मक वा नकारात्मक गोष्टी घडतील, याचा विचार करावा.
बदल फायद्याचा ठरेल असे वाटावे यासाठी आपण ही संपूर्ण प्रक्रिया तर्कशुद्ध करण्याचा प्रयत्न करू या. कोणताही बदल स्वीकारताना आंतरिक आणि बाह्य घटक कार्यरत असतात. काही वेळा इतर लोकांना आपल्या व्यक्तित्वाची सवय झालेली असल्याने बदल नको असे आपल्याला वाटत असते. हे लोकही तसे आपल्याला सांगतात ते त्यांची सवय न मोडावी म्हणून. त्यामुळे आपण स्वत: बिलकूल डगमगून न जाता ‘आपण बदलायला हवे’ (व्यावसायिक, स्वभाव-वैशिष्टय़ांमध्ये, कौटुंबिक इत्यादी बाबतीत) हे सुनिश्चित केलेले असेल तर बाह्य अडथळ्यांचा आपल्यावर विपरीत परिणाम घडणार नाही. अशावेळी आपला आत्मविश्वास व निर्धार पक्का करण्यासाठी आपल्या मनाशी पुढील प्रकारे संवाद साधणे उपयुक्त ठरू शकते..
१) ‘मला माझ्या व्यक्तित्वात बदल घडवून आणायचा आहे हे मी ठरवले आहे आणि हे ध्येय मी माझ्या दृष्टिक्षेपात नेहमी बाळगेन.’
२) ‘इतर लोक मला मागे खेचण्याचा प्रयत्न करू शकतील. त्यांचे म्हणणे मी ऐकेन आणि तर्काला धरून जे असेल त्याचा स्वीकार नक्कीच करेन. पण Comfort Zone मध्ये पुन्हा ढकलणाऱ्या मानसिकतेपासून, विचारांपासून आणि अशा स्वभावपैलूंपासून मी भावनिक अंतर बाळगेन, त्याने विचलित होणार नाही.’
३) ‘आयुष्याच्या कोणत्या भागांत बदल अपेक्षित आहे हे समजून घेईन आणि दर दिवशी या बदलांच्या जवळ घेऊन जाणारी एक तरी कृती करण्याचा प्रयत्न करीन. संभाव्य अपयशाकडे बोधात्मकदृष्टय़ा पाहीन, निराश होणार नाही. यात ‘चलते रहो’चा नारा महत्त्वाचा!’
४) ‘प्रोत्साहन देणारी मानसिकता बाळगणाऱ्यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करेन. तसेच प्रभावी व्यक्तींच्या यशोगाथा समजून घेऊन त्यांतील कंगोरे आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.’
हा स्वसंवाद काही अल्लादीनचा जादूई दिवा नव्हे, की ज्याच्या उच्चाराने सगळे चित्रच पार पालटून जाईल आणि ज्यातून आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील! म्हणूनच या संवादातील सूचक कल्पना आपल्या मेंदूला पटवून त्याला चालना देणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी याची नियमित उजळणी करून, विचारांतून व कृतीतून ही बदलाची योजना निसटू न देण्याची, ‘येरे माझ्या मागल्या’ टाळण्याची गरज आहे. थोडक्यात, ‘बदल’ या संकल्पनेची परिभाषा आधी कल्पिलेल्याहून बदलून ती ‘ब’- बरेच काही, ‘द’- दिलासा देणारे, ‘ल’- लाभदायक ठरणारे, (आयुष्य) लयबद्ध करणारे- अशी करण्याची गरज आहे.
या व्याख्येनेच बदलेल आपला दृष्टिकोन! तो म्हणजे- ‘असा मी, असाच मी’ नव्हे, तर ‘असा मी, असाही मी!’
डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:01 am

Web Title: process of changes in humans being
Next Stories
1 मानसिकता.. वारीची!
2 रूप-स्वरूप
3 डबक्यातले बेडूक
Just Now!
X