माणसात मत्सर का निर्माण होतो? सोप्या शब्दांत सांगायचं, तर ‘मद् सर’ म्हणजे ‘मद्’चं, खऱ्या स्वरूपाचं भान सुटून द्वैतमय स्थितीचं भानच वाढत जातं तेव्हा मत्सराचा प्रवेश होतो. ‘मी’ म्हणजे देहच, हा भाव पक्व असल्यानं या देहबुद्धीतून ‘मी’ आणि ‘माझे’च्या सुखाचाच विचार केवळ सुरू राहातो. या सुखाच्या आड जे-जे येतं त्याचा विषाद वाटतो. द्वेष वाटतो. त्याचवेळी सुखाचं म्हणून जे आहे ते दुसऱ्याला सारं प्राप्त होत आहे, या जाणिवेनं त्या व्यक्तिविषयी मनात मत्सरभाव जागा होतो आणि वाढतच जातो. वणवा जसा जंगलातच उत्पन्न होतो आणि त्या जंगलाचीच राखरांगोळीही करू शकतो, त्याचप्रमाणे माझ्याच चित्तात निर्माण झालेला हा मत्सराचा वणवा माझीच सर्वाधिक आंतरिक हानी घडवतो. हे लक्षात मात्र येत नाही. दुसऱ्याविषयी मत्सर वाटू लागल्यानं त्या माणसाची काय हानी होणार? उलट माझाच सदोदित जळफळाट होणार आणि त्यानं माझंच मन अशांत, अस्वस्थ, अस्थिर होत राहाणार. त्या मानसिक अशांतीचा शरीरावरही विपरीत परिणाम होणार. मत्सर आपल्या वैचारिक, मानसिक, बौद्धिक पातळीवरच घाला घालतो. खऱ्याचं आकलन संपतं आणि आपल्या मनाला जे वाटतं त्याचाच हेका माणूस धरू लागतो. दुसऱ्याशी येणारं वितुष्ट आणि दुसऱ्याची मी करीत असलेली निंदा ही अनेकदा माझ्या अंतरंगातील मत्सरातूनच उत्पन्न होत असते. तसं मी कबूल मात्र करीत नाही. उलट मी जी दुसऱ्याची निंदा करीत आहे, त्याच्याशी माझं जे भांडण आहे, त्यात माझीच बाजू कशी बरोबर आहे, असा दावा मी हिरीरीनं करीत राहातो. समर्थ ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात सांगतात, ‘‘मत्सरें सत्य मानेना सत्याचें लटकें करी।।’’ मत्सरापायी माणूस जे सत्य आहे, खरं आहे ते खरं मानतच नाही. त्या सत्यावरच असत्याचा आरोप करतो. एवढंच नाही तर, ‘‘बऱ्याचें वोखटें सांगे मज नाहीं म्हणोनियां। पैशुन्य नस्तेंचि करणें नसता कुंद लावणें।। नस्ते नस्ते ढाल घेणें ऐसी हे जाति मत्सरी। आपणु करंटा आहे समर्था निंदितो सदा।।’’ आपल्यापेक्षा जो ‘सुखी’ भासतो, ज्याला आपल्यापेक्षा अधिक यश, अधिक नावलौकिक, अधिक मान आहे त्याचं जे चांगलं आहे त्यालाही मत्सरापोटी नावं ठेवली जातात. त्याच्यात दोष नसूनही तो पाहिला जातो. त्याच्या स्वयंघोषित दोषांचीच चर्चा करावीशी वाटते. अपप्रचाराची ढाल घेऊन आपला ‘मी’पणा सुरक्षित ठेवण्याची धडपड केली जाते. जो खरा आहे, समर्थ आहे त्याचीही मत्सरापायी निंदा करीत राहाण्याचं करंटेपण मी जोपासतो. समर्थ सांगतात, असा मत्सरी माणूस स्वत: कुकर्मात रत असताना सत्कर्मात जो रत आहे त्याच्यावर टीका करीत राहातो, स्वत: आचार आणि विचार भ्रष्ट असतानाही ज्याचे आचार आणि विचार शुद्ध आहेत त्याच्यावर आरोप करीत राहातो, आपण कपटी असूनही दुसऱ्याला कपटी ठरवतो, आपण घातकी असूनही दुसऱ्यावरच घातकीपणाचा आरोप करीत राहातो. या मत्सरानी मनुष्यजन्माची मोठी हानी होते. समर्थ सांगतात, ‘‘मत्सरें भाग्यही गेलें मत्सरें बुद्धि नासिली। भक्ति ना ज्ञान ना कांहीं अरत्र परत्र नसे।।’’ मत्सरामुळे जे भाग्यात होतं तेदेखील गमावलं जातं. भाग्यात काय होतं? तर माणसाच्या जन्माला येऊन माणुसकीनं जगत जीवन व्यापक करणं, परमतत्त्वाशी ऐक्य साधणं, हे भाग्य होतं. ते भाग्यदेखील लयाला जातं. मत्सरामुळे बुद्धी नासते. म्हणजे बुद्धी विपरीत होऊन जाते. तिच्या खऱ्या क्षमतांचा खरा वापर न होता मत्सरग्रस्त होऊन त्या क्षमतांचा गैरवापरच अधिक होतो. मग अशा मत्सरी माणसाला ना खरी भक्ती गवसते, ना खरं ज्ञान गवसतं. जन्म अज्ञानातच सरून जातो. म्हणूनच साधनापथावर चालणाऱ्या साधकानं मत्सराबाबत जागरूक राहायला हवं.

-चैतन्य प्रेम

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!