एका सद्गुरू बोधाशिवाय देहभाव आणि मनोभावातला फोलपणा समजूच शकत नाही आणि जोवर त्यातला फोलपणा समजत नाही तोवर ते खऱ्या अर्थानं सुटूही शकत नाहीत. एकदा आपल्या गावी निघालेल्या इसमाला आडरानातून जाताना काही तरी चकाकताना दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर सोन्याचे अलंकार दिसले. मोठय़ा आनंदानं त्यानं ते आपल्या गाठोडय़ात नीट बांधून घेतले. घरी आल्यावर त्यानं ते फडताळातल्या चोरकप्प्यात अगदी सुरक्षित ठेवून दिले. ते सुरक्षित आहेत की नाही याची तो अधेमधे खातरजमा करीत असे. एकदा एक शेत विकत घेण्याच्या हेतूनं त्यानं ते दागिने मोडायचं ठरवलं. गावातल्या अत्यंत सज्जन आणि जुन्याजाणत्या परिचित सोनाराकडे त्यासाठी तो गेला. त्या दागिन्यांची पारख करून सुवर्णकार म्हणाला, ‘‘पाहताक्षणी आणि हातात घेताच मला आलेला अंदाज खरा ठरला आहे. हे दागिने बनावट आहेत. यात सोन्याचा अंशही नाही!’’ मग तो इसम घराकडे निघाला आणि वाटेत लागलेल्या नदीत त्यानं ते दागिने फेकून दिले. म्हणजेच आपण जिवापाड जपलेले दागिने खोटे आहेत, हे जेव्हा समजलं तेव्हा ते टाकले गेले. तसं जोवर आपल्या इच्छांचा फोलपणा लक्षात येत नाही तोवर त्यांचा मनावरचा प्रभाव नष्ट होऊ शकत नाही.. त्यांचा त्याग होऊच शकत नाही. हा फोलपणा सद्गुरूच आपल्या बोधाद्वारे जाणवून देतात आणि मग निरिच्छतेसाठीचा अभ्यास करवून घेतात.  बोध ऐकणं म्हणजे ऐकलेला बोध कृतीत येऊ  लागणं. बोधानुसार कृती घडत नसेल, तर त्याचा अर्थ बोध नीट ऐकलाच गेलेला नाही, हा आहे! तेव्हा बोध ऐकल्यावर आचरण सुधारण्याचा अभ्यास सुरू झाला पाहिजे. तो जसजसा प्रामाणिकपणे होऊ  लागेल तसतसं वासनेचं, विकारांचं, इच्छांचं आणि ऊर्मीचं वास्तविक स्वरूप लक्षात येऊ  लागेल. मग प्रसंगी त्या वासना भोगतानाही त्या वासनेचा मनावर अदृश्य ताण किंवा वचक उरणार नाही आणि मनाला मोकळं राहता येईल. मग तोवर वासनाडोहात बुडालेलं मन सदगुरूकेंद्रित होऊ  लागेल. मनातल्या सर्व वासना हळूहळू सद्गुरू इच्छेत विरून जाऊ  लागतील. सद्गुरू अखंड ज्या परम स्वरूपात निमग्न आहेत, त्या रूपात मन बुडेल आणि त्यायोगे अंत:करणातला भवसागर जागीच आटून जाईल.. मग तो पार करण्याचा प्रश्नच उरणार नाही! तेव्हा रामबोधानं अर्थात सद्गुरू बोधानं देहभाव उडाला आणि रामरूपात म्हणजेच शाश्वत अशा सद्गुरू तत्त्वात मन लय पावू लागलं की सद्गुरू कथेत अर्थात त्यांच्या जीवनध्येयानुसार आपलं जीवन घडविण्याच्या त्यांच्या लीलेत साधक तल्लीन होऊन जातो. असा साधकच शाश्वत सुख प्राप्त करीत पूर्ण आत्मतृप्त होतो.  समर्थ म्हणतात, ‘‘जगीं धन्य तो रामसूखें निवाला, कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला। देहेभावना रामबोधें उडाली, मनोवासना रामरूपीं बुडाली!!’’ संत माणिक प्रभु यांचा एक अभंग याच प्रक्रियेचं आणि स्थितीचं वर्णन करणारा आहे. त्यात ते म्हणतात की, ‘‘साजणी गुरूनें कौतुक केलें ग।। ध्रु।। बसवुनि सन्मुख सांगुनि गोष्टी। हात धरूनि मंदिरांत नेलें ग।। १।। ‘तत्त्वमसि’ महावाक्य निरूपणी। द्वैत रहित अद्वैतचि ठेलें ग।।२।। माणिक म्हणे सद्गुरू करुणोदयीं। मीपण अंध:कारचि गेलें ग।।३।।’’ सद्गुरूनं केलेलं कौतुक सांगणं, हा या अभंगाचा हेतू आहे. काय कौतुक आहे? तर त्यानं आधी मला सन्मुख केलं! मी तोवर जगाला सन्मुख आणि सद्गुरूंना विन्मुख होतो. मग मी जेव्हा जगाकडे पाठ फिरवली तेव्हा त्यांनी बोध करीत मला मनाच्या गाभाऱ्यात नेलं. तिथं माझं खरं स्वरूप काय आहे, याची जाण करून देत, आत्मभान जागवत जीवनातलं समस्त द्वंद्व संपवलं. हा सद्गुरू करुणेतूनच अवतरला आहे.. त्याच्यामुळे मीपणाचा, मोहभ्रमजन्य अज्ञानाचा अंधकार समूळ नष्ट झाला आहे.