समर्थ म्हणतात, पुढे पाहता पाहता देव जोडे! याचाच अर्थ परमार्थाच्या या मार्गात जर माणूस प्रत्येक पाऊल पुढे टाकत गेला, तर देव जोडला जाणार आहे. हा देव कोण आहे? हे रहस्य समर्थानी ‘मनोबोधा’च्या १७९व्या श्लोकात सांगितलं आहेच. पण या घडीला जो देतो तो देव, या शब्दार्थानुसार विचार करू. हा जो देव आहे तो शाश्वत आहे, असंही संत सांगतात. मग तो जे देतो ते शाश्वतच असलं पाहिजे. तेव्हा हा जो देव जोडायचा आहे तो शाश्वत देणाराच असला पाहिजे. आपण सारी धडपड करतो ती सुखासाठी असते. देवाकडेही आपण सुखाचीच अपेक्षा करतो. तेव्हा या देवाकडून शाश्वत असं सुख, शाश्वत समाधानच मिळालं पाहिजे. त्या देवाची प्राप्ती नाही म्हणून शाश्वत काय हेच उमगलेलं नाही. शाश्वत सुखही नाही आणि समाधानही नाही. अशाश्वताच्या मोहातून चित्तात केवळ भ्रम, भ्रांती आणि अज्ञान आहे. अज्ञानामुळेच अशाश्वताला शाश्वत मानलं जात आहे. त्या अज्ञानातूनच भ्रम वाढत आहे आणि मग जे काही करीत आहोत त्यातून सुखच मिळेल, अशी भ्रांतीही वाढत आहे. या अज्ञानाचा उगम कुठे आहे, हे समर्थ आता ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १४५व्या श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात:

सदा वीषयो चिंतितां जीव जाला।

अहंभाव अज्ञान जन्मासि आला।

विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें।

जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावे।। १४५।।

प्रचलित अर्थ :  मूळचा ब्रह्मस्वरूप असलेला जीव हा विषयांच्या सततच्या चिंतनाने जीवपणास येऊन अहंभाव आणि अज्ञानाने वेष्टित होऊन जन्मास आला. जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडला. तोच जीव विवेकाने मिथ्यामायेचा त्याग करून आत्मस्वरूपाच्या निदिध्यासाने तद्रूप होत उगमाशी जाऊन भिडला की जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतो.

आता मननार्थाकडे वळू. विषय म्हणजे काय? तर पाहणं हा डोळ्यांचा विषय आहे, गंध घेणं हा नाकाचा विषय आहे, चव घेणं हा जिव्हेचा विषय आहे, श्रवण हा कानांचा विषय आहे.. असे प्रत्येक इंद्रियाचे विषय आहेत. आपण मागेच पाहिलं की प्रत्यक्षात इंद्रियं विषय भोगीत नाहीत. त्या विषयभोगाचं सुख मनालाच असतं. इंद्रियं केवळ उपकरणमात्र आहेत. तरीही मनालाच वळवायचं असल्यानं आणि वळण लावायचं असल्यानं एकटय़ा मनावर सगळं खापर फोडून चालत नाही! म्हणून इंद्रियांकडे बोट दाखवलं जातं. तर स्पष्ट सांगायचं तर इंद्रियांच्या माध्यमातून मनच सदोदित विषयांत रममाण आहे. म्हणजे डोळ्यांच्या दर्शन क्षमतेचा वापर करीत जे सुखावणारं आहे ते पाहण्याची मनाला ओढ आहे. जिव्हेच्या माध्यमातून जे तृप्त करणारं आहे ते चाखण्याची मनाला ओढ आहे. कानांच्या माध्यमातून जे ऐकायला सुखद आहे ते ऐकण्याची मनाला ओढ आहे. तर मनच असं सदोदित विषयात रमतं. ते विषयांचं मनन करतं तेव्हा मन बनतं, चिंतन करतं तेव्हा चित्त बनतं, त्या विषयांच्या प्राप्तीसाठीचा बोध करतं तेव्हा बुद्धी बनतं! आणि या मन, चित्त, बुद्धी यांच्या क्षमतेनुसार इंद्रियांचा वापर करीत जेव्हा जीव या जगात रूतत जातो तेव्हाच त्याच्यात ‘मी’पणा अर्थात अहंभाव निर्माण होतो आणि त्या अहंभावानुसार त्याच्या मनात अनंत इच्छा उत्पन्न होतात. जुगाऱ्याला जुगार खेळण्याची सक्ती नसते. केवळ जिंकण्याच्या इच्छेतून आणि ईष्र्येतून तो जुगार खेळत राहातो. जिंकला तर अधिक उमेदीनं खेळतोच, पण हरला तरी कधीतरी जिंकूच, या आशेनं खेळतो! अगदी त्याचप्रमाणे जीव हा सुखाच्या इच्छेतून जन्माला येत राहातो. कोणत्या ना कोणत्या जन्मी मला सुख लाभेलचं, हा अत्यंत सूक्ष्म आणि सुप्त असा विचार त्याच्या मनात असतो. तो संपूर्ण सुखप्राप्तीचा जन्म हाच ठरावा, या ईष्र्येनं मग तो, खरं सुख म्हणजे काय, हे माहितही नसताना सुख मिळवण्यासाठी धडपडू लागतो.