समर्थ सांगतात, जो खरा सद्गुरू आहे त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे मग मुक्ती लाभेल! आता हा विश्वास ठेवणं, म्हणजे काय? कशावर विश्वास ठेवणं इथं अभिप्रेत आहे? तर आधीच्या चरणांच्या उहापोहानुसार हा सद्गुरू ब्रह्मा-विष्णु आणि महेश यांच्याही पलीकडे आहे, जे व्यक्त-अव्यक्त आणि या दोहोंपलीकडील आहे त्याच्याही पलीकडे सद्गुरू तत्त्व आहे, यावर विश्वास ठेवणं अभिप्रेत आहे. किंवा त्यांच्याच आधारे मुक्ती मिळेल, यावर विश्वास ठेवणं अभिप्रेत असावं. पहिल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा याचाच अर्थ सद्गुरू हा सर्वसमर्थ आहे, यावर विश्वास ठेवणं आहे. अर्थात माझं खरं हित कशात आहे, हे ते जाणतात. त्यामुळे ते जे सांगत आहेत, ते जो बोध करीत आहेत, त्यानुसारच आचरण करून माझं खरं हित साधलं जाईल, यावर हा विश्वास अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बोधानुसार आचरण करूनच मला मुक्त होता येईल, यावरही विश्वास अपेक्षित आहे. निसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘पहिलं पाऊल टाकण्याइतपतच विश्वास माझ्यावर ठेवा. मग अनुभवामुळे पुढली पावलं तुम्हीच स्वत:हून टाकाल!’’  याचाच अर्थ बोध आचरणात आणण्याची थोडी तरी सुरुवात केली की अनुभव येऊ लागेल. अर्थात आचरणाचं प्रमाण जितकं असेल त्या प्रमाणातच अनुभव मिळू लागतील, हे लक्षात ठेवलं पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘गाडीत बसल्यावर आपण ठरलेल्या गावी पोहोचू, एवढा विश्वास तरी चालकावर ठेवता ना? निदान तेवढा तरी विश्वास माझ्यावर ठेवा!’ म्हणजेच दिवसभरातल्या अनंत गोष्टी आपण दुसऱ्या व्यक्तीवर, परिस्थितीवर किंवा गोष्टींवर विश्वास ठेवून पार पाडत असतो. म्हणजे रेल्वेने प्रवासाला निघालो तर ही गाडी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत आपल्याला नेईल, हा विश्वास आपण ठेवतो. उपचारासाठी डॉक्टरकडे गेल्यावर त्याच्या रोगनिदानावर आपण विश्वास ठेवतोच आणि त्यानं दिलेल्या औषधाचा गुण येईलच, असाही आपण विश्वास ठेवतो. एखादी वस्तू घेतो तेव्हा ती चांगलीच निघेल, यावर विश्वास ठेवतो. तेव्हा जगताना प्रत्येकवेळी आपण विश्वास ठेवतो, त्यातला काही अंशी विश्वासही आपण संतसज्जनांवर किंवा त्यांच्या सांगण्यावर ठेवत नाही. तर समर्थ सांगतात की, जर त्यांच्यावर विश्वास टाकलात तरच मुक्त जगण्याचा मार्ग गवसेल. मग प्रश्न असा येतो की हा खरा सद्गुरू मिळणार कसा आणि कुठे? आणि तो मिळावा यासाठी काय करावं, याचंच मार्गदर्शन समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १५१व्या श्लोकात करीत आहेत. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

खरें शोधितां शोधितां शोधताहे।

मना बोधितां बोधितां बोधताहे।

परी सर्व ही सज्जनाचेनि योगे।

बरा निश्चयो पाविजे सानुरागे।। १५१।।

प्रचलित अर्थ : सत्य परब्रह्माचा शोध घेता घेता म्हणजे त्याचा विचार करता करता ते आकळते. मनाला त्याचा बोध करता करता त्याचा बोध होतो. पण हे सारे सत्संगाने होते. म्हणून संतगुरूचरणी प्रेम ठेवावे म्हणजे ब्रह्माचा निश्चय होतो.

हा श्लोक आध्यात्मिक वाटचालीतलं एक फार मोठं सत्य सांगतो. यातले शेवटचे जे दोन चरण आहेत त्यात जे सांगितलं आहे ते आधीही समर्थानी सांगितलं आहेच की, अध्यात्मात काहीही जर प्राप्त करायचं असेल, तर त्यासाठी सज्जनांचा योगच घडला पाहिजे आणि साधला पाहिजे. आध्यात्मिक वाटचालीसाठी आपला जो आंतरिक निश्चय असतो तो या सत्संगाशिवाय दृढ होत नाही, टिकत नाही आणि प्रत्यक्षात उतरत नाही. तेव्हा सत्संगाचं याआधीही सांगितलेलं महत्त्व समर्थ इथंही सांगतात. पण खरं रहस्य आहे ते पहिल्या दोन चरणांत आणि ते पटकन जाणवतही नाही.