12 July 2020

News Flash

४९४. जाणता मूर्ख!

. एका श्लोकात समर्थानी ‘जनी जाणता’ हा शब्द वापरलाच आहे.

परमतत्त्वाला जो जाणतो तो वेगळेपणानं उरतच नाही. रामकृष्ण परमहंस सांगत, ‘‘एक मिठाची बाहुली. समुद्राची खोली मापायला गेली. तर ती परत येईल का?’’ जर ती परत येत असेल तर त्याचा अर्थ एकच की, तिनं समुद्र मापलाच नाही. तो मापू पाहिला असता तर ती विरघळून गेली असती. तसं परमतत्त्व जो जाणतो तो त्यातच विरघळून जातो, एकरूप होतो. हेच सूत्र धरून समर्थ रामदास म्हणतात :

म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे।

अतर्कासि तर्की असा कोण आहे।

जनीं मीपणें पाहतां पाहवेना।

तया लक्षितां वेगळें राहवेना।। १५६।।

इथं एक गोष्ट नीट लक्षात घ्या. एका श्लोकात समर्थानी ‘जनी जाणता’ हा शब्द वापरलाच आहे. अर्थात जनांमध्ये म्हणजे संतजनांमध्ये राहूनही तो परमावतारी सत्पुरुष सद्गुरू आपल्या कार्यहेतूबाबत पूर्ण जागरूक असतो. आता इथं मी जाणता आहे, हे म्हणणारा जाणता अभिप्रेत आहे! जो संतजनांमध्ये वावरत आहे, स्वत: संत असल्याचं भासवत आहे आणि त्याचवेळी तो स्वत:ला जाणता म्हणवत आहे, तो मूर्ख आहे! जो अतक्र्य आहे त्याला तर्कानं कोण जाणणार? पण त्या परमतत्त्वाचं वर्णन हा ‘जाणता’ मात्र तर्कानंच करू लागतो! तर्ककर्कश चर्चा करू पाहातो. शब्दचातुर्य आणि वाक् पटुतेच्या जोरावर प्रभाव टाकू पाहतो. संत कधीच मीपणाने वावरत नाहीत. हा ‘जाणता’ मात्र मीपणाच्याच भिंगातून पाहत असतो. त्या परमतत्त्वाला मात्र मीपणानं कोणी पाहू शकत नाही.  एकदा परमतत्त्वाचं दर्शन झालं की त्याला जाणणारा मीपणाने  वेगळा उरूच शकत नाही. समर्थ सांगतात :

बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे।

जया निश्चयो येक तोही न साहे।

मती भांडती शास्त्रबोधें विरोधें।

गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें।। १५७।।

श्रुती न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें।

स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें।

स्वयें शेष मौनावला स्थीर राहे।

मना सर्व जाणीव सांडून पाहे।। १५८।।

कितीही शास्त्रं धुंडाळा त्यांचा उपयोग नाही. शब्दांच्या चिमटीत तो परमात्मा गवसणारा नाही. पुन्हा शब्दांनी जे गवसलं त्यावर धारणा स्थिर होत नाही. निश्चय टिकत नाही. कारण ही शास्त्रं, पुराणं तरी एकमत कुठे मांडतात? प्रत्येक देवतेचं पुराण एकच दावा करतं की हा देव म्हणजेच परब्रह्म आहे. त्याचीच उपासना केली पाहिजे. ‘गणेशपुराण’ वाचलं की वाटेल गणपती हाच एकमेव खरा देव आहे.. ‘देवीपुराण’ वाचलं की वाटेल या चराचरात देवीपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही.. तेव्हा शास्त्र अनेक धुंडाळली तरी त्यानं एक निश्चय होणं, एक विचार होणं साधणार नाही. उलट गोंधळच वाढेल. स्वत: महादेवांनी गुरूगीतेत पार्वतीमातेलाही सांगितलंच की वेदांपासूनच सर्वच साहित्य हे माणसाला एकाच दिशेला न नेता, एकाग्र न करता त्याला भ्रमित करणारंच आहे! याचं कारण एकच जे वाचलं त्यातलं खरं सार काढणं माणसाच्या आवाक्यातलं नसतं. जो त्या तत्त्वाशी एकरूप आहे तोच ते सांगू शकतो आणि मग जाणवतं की सर्व काही एकच आहे! या अनेकत्वांत एकत्वच आहे. पण स्वमतीनं जो जोखू पाहतो तो भांडतच राहतो. मग त्या ‘ज्ञानबोधा’च्या नावावर अज्ञानाची खुंटीच बळकट करण्याचा प्रयत्न होतो आणि जी खरी गती आहे ती खुंटून जाते. श्रुती-स्मृती, वेद, वेदांत, न्याय, मीमांसादि तर्कशास्त्रं यातली वाक्य विचित्र भासतात. कारण त्यांचा खरा रोख लक्षातच येत नाही आणि भलताच अर्थ काढून माणूस भरकटतो. स्वत: शेषही मौनावला, तेव्हा हे मना या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी जी जाणीव आहे, ती सांडून एकदा नीट पहा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2017 2:07 am

Web Title: samarth ramdas philosophy 355
Next Stories
1 ४९३. तया सांडुनि!
2 ४९२. अंतरीची खूण
3 ४९१. योग आणि भोग
Just Now!
X