समर्थ सांगतात, जे बाह्य़ आणि आंतरिक बोलणं आहे ते ध्येयसंगतच असू द्या. त्याचबरोबर पुढे सांगतात की, ‘‘हिताकारणें सर्व शोधूनि पाहे!’’ या चरणाच्या अनेक अर्थछटा आहेत. माणूस जन्मापासून काय शोधत असतो? तर सुख शोधत असतो. जन्मापासूनची आपली प्रत्येक क्रिया, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक कृती, प्रत्येक धडपड ही केवळ आणि केवळ सुख मिळावं, याचसाठी असते. प्रत्यक्षात ज्या सुखासाठी आपण एवढं धडपडतो ते सुख खरंच सुख असतं का, याची खातरजमाही आपण करीत नाही. जे या घडीला सुखाचं वाटतं ते मिळवण्यासाठीच सारी शर्थ असते. जे सुखाचं वाटलं म्हणून कष्टानं मिळवलं ते मग दु:खाचं वाटू लागलं की ते त्यागण्याची धडपड आणि नव्यानं सुख मिळवण्याची धडपड सुरू! तेव्हा समर्थ सांगतात, बाबा रे तुझा जो अव्याहत शोध सुरू आहे ना, तो केवळ हिताला अनुलक्षूनच असला पाहिजे, ध्येयसंगतच असला पाहिजे. इथून पुढे होणारा प्रत्येक प्रयत्न हा आत्महित साधण्यासाठीच असला पाहिजे. प्रत्येक शोध हा अखंड टिकणाऱ्या खऱ्या सुखासाठीच असला पाहिजे. थोडक्यात साधकानं त्याच्या प्रयत्नांकडे, त्या प्रयत्नांमागील हेतूंकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. आता ‘हिताकारणें सर्व शोधूनि पाहे,’ची दुसरी अर्थछटाही मनोज्ञ आहे. समर्थ म्हणतात, हे साधका, तुला खऱ्या अर्थानं निर्भय, निश्िंचत, नि:शंक अर्थात सुखी व्हायचं आहे ना? मग जो ‘सर्व’ आहे त्याचाच शोध घे! जो अपूर्ण आहे तो अपूर्णाला पूर्णत्व देऊ शकत नाही. जो पूर्ण आहे तोच पूर्णत्व देतो! जो संकुचित आहे तो दुसऱ्या संकुचिताला व्यापक करू शकत नाही. जो व्यापक आहे तोच संकुचिताला व्यापक करू शकतो! आणि जेव्हा या सर्वत्र पसरलेल्या परमतत्त्वाचा शोध सुरू होतो तेव्हा दोन धोकेही निर्माण होतात. पहिला धोका बंड आणि दुसरा धोका पाखंड! म्हणजे मला झालेला साक्षात्कारच खरा! देव मी सांगतो त्याच मार्गानं गवसेल, हे झालं बंड.. आणि मग आपल्या मार्गाच्या प्रसारासाठी लोकानुनयी भ्रामक कल्पनांचा आधार घेऊन लोभ, मोह, भय पसरवून आपला पाया बळकट करणं हे झालं पाखंड!  या पाखंडानं परहित साधलं जात नाहीच, पण आत्महितही लयाला जातं. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘जो जगाचा घात करतो तो एकवेळ परवडला. कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल. पण जो स्वत:चा घात करतो त्याला कोण सांभाळणार?’’ तेव्हा पाखंडानं जग काही काळ वाहवा करील, पायावर लोटांगण घालील, पण पाखंड उघड होताच? तेच जग निंदा करील, टीका करील.. मग काय? ना धड खरी साधना झाली ना कुणाचं हित साधलं. ‘दासबोधा’च्या १८व्या दशकाच्या पहिल्या समासात समर्थ म्हणतात, ‘‘प्राणी साभिमानें भुलले। देह्य़ाकडे पाहात गेले। मुख्य अंतरात्म्यास चुकलें। अंतरीं असोनी।।’’ अहंकारापायी साधक जर भुलला आणि बाह्य़, स्थूल तत्त्वातच अडकला तर अंतरात्म्यास तो अंतरतो. अर्थात जी शुद्ध जाणीव आहे तिला अंतरतो. सर्व शोध अशाश्वत, अस्थिर, नश्वर अशा गोष्टींचाच सुरू राहातो आणि त्यांच्या बळावर शाश्वत, स्थिर अखंड असं समाधान मिळेल, या भ्रमात तो राहातो. तेव्हा शोध घ्यायचाच असेल तर अपूर्णाचा नको, पूर्णाचा घ्या. संकुचिताचा नको, व्यापकाचा घ्या, असंच समर्थ सांगत आहेत. या शोधाआड येणाऱ्या बंडाचा आणि पाखंडाचाही बीमोड करायला सांगत आहेत. या आत्महिताची जाणीव कशानं होईल? जेव्हा स्वार्थप्रेरित वादाची आणि संवादाचीही गोडी उरणार नाही, जेव्हा जगाचा प्रभाव ओसरू लागेल, त्या जगात मान मिळावा, नावलौकिक मिळावा यासाठी पाखंडात रमण्याची सवय मोडेल, तेव्हाच आत्महिताकडे लक्ष जाईल. ते आत्महित साधण्यासाठी मिळालेल्या क्षमतांकडे लक्ष जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजवर अमूल्य वेळ कसा वाया गेला हे समजेल आणि उरलेल्या आयुष्याचं महत्त्वही जाणवेल. -चैतन्य प्रेम