पसाऱ्याचा व्याप दिसला आणि तो सांभाळण्यापायी होत असलेला ताप दिसला तरी दृश्याचा प्रभाव इतका विलक्षण असतो की सत्याच्या भानापासून न ढळण्याचा आणि असत्यात न गुंतण्याचा निश्चय ऐनवेळी विस्मृतीत जातो. असं होऊ नये यासाठी समर्थ सांगतात, ‘‘मना सत्य तें सत्य वाचे वदावें, मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें।।’’ हा चरण फार सूचक आहे. काणेमहाराजांनी ‘‘मना सत्य तें सत्य वाचे वदावें’’ या चरणाचा अर्थ, ‘‘हे मना, सत्य अशा परब्रह्म वस्तू आत्मारामाचे नामस्मरण बेंबीच्या देठापासून, परेतून करीत जा,’’ असा अर्थ सांगितला आहे आणि ‘मिथ्या’चा अर्थ मिथ्या कल्पना, हा सांगितला आहे. थोडक्यात सत्य असे जे नाम आहे त्याचा उच्चार वाचेनं  करायला आणि मिथ्या कल्पनांचं स्मरण सोडून द्यावं, असा या चरणाचा व्यापक अर्थ आहे. आता थोडा त्याचा विचार करू. ‘‘मना सत्य तें सत्य वाचे वदावें’’ या चरणात सत्य हा शब्द दोनदा आला आहे. जे सत्य आहे ते ज्या वाचेनं उच्चारायचं आहे ती वाचाही सत्य असली पाहिजे, असा याचा गूढार्थ आहे! आता वाचा सत्य म्हणजे काय? तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा आशय असा होता की, ज्या मुखानं आपण जेवतो त्याच मुखानं शौचही होऊ लागलं, तर कसं वाटेल? फार मार्मिक प्रश्न आहे बरं हा! कल्पनेतही आपल्याला किळस वाटते! पण ज्या मुखानं आपण नाम घेतो त्याच मुखानं दुसऱ्याची यथेच्छ निंदा करताना, दुसऱ्याच्या दोषांबद्दल आवडीनं बोलताना, अहंकारातून दुसऱ्याला अपमानास्पद बोलताना, दुसऱ्याविषयी चवीनं खोटीनाटी चर्चा चघळताना आपल्याला किळस वाटते का? परनिंदेत रममाण वाणीनं नाम घेणं म्हणजेच तुकाराम महाराजांच्या मते ज्या मुखानं खायचं त्याच मुखानं शौचही करणं! या चरणानं आणखी एक प्रश्न उमटतो, तो असा की, नाम हे सत्यच असलं तरी आज ते आपल्याला सत्य का वाटत नाही? मग याच श्लोकाच्या प्रकाशात विचार केला की जाणवतं, नाम हे सत्य वाटत नाही कारण आपली वाचा ही सदोदित असत्याच्या चर्चेतच गुंतली असते! मग अशा वाचेला जिथं नाम आवडतही नाही तिथं ते सत्य तरी कसं वाटेल? तेव्हा नामाचं सत्यत्व जर अंतरंगात प्रकट व्हावंसं वाटत असेल तर आधी असत्यातलं वाणीचं गुंतणं कमी केलंच पाहिजे. इतकं नाम घेतो, पण समाधान का नाही, असा प्रामाणिक प्रश्न काहींना पडतो. पण ज्या गोष्टींनं असमाधान वाढतं किंवा मनाचं समाधान भंगतं अशा गोष्टींच्या चर्चेत आणि अशा गोष्टी अनुभवण्यात आपण किती गुंततो, याचंही परीक्षण केलं पाहिजे. तर जे असत्य आहे, भ्रामक आहे, अशाश्वत आहे, मिथ्या म्हणजेच बदलणारं आहे त्याच्या चर्चेतली ओढ कमी झाल्याशिवाय जे सत्य आहे, वास्तव आहे, शाश्वत आहे अशा नामाची ओढ कशी लागेल? नव्हे नाम हेच सत्य आहे, शाश्वत आहे, हे तरी कसं वाटेल? तरीही हाच उपाय आहे की सत्याचं नामस्मरण सुरू करावं! ज्यांना वाटतं की आपला मार्ग नामाचा नाही, त्यांनी स्मरण तरी सुरू करावं! आपल्या साधनेचं स्मरण, सद्गुरूंच्या बोधानुरूप आपली धारणा कशी असावी, याचं स्मरण, जगताना त्या परमतत्त्वाचं स्मरण, हे जर राखलं जात असेल तर त्यात आणि नामस्मरणात काही भेद नाही. कारण सद्गुरू बोधाचं स्मरण अखंड टिकवताना सद्गुरू नामाचं स्मरणही आपोआप साधतंच. तर प्रपंच आणि परमार्थ अशा दोन्ही गोष्टी आपल्या जगण्यात आहेत. प्रपंच हा संकुचित आहे आणि परमार्थ व्यापक आहे. समर्थ सांगतात, ‘‘अनंत तो अनंत रे। प्रपंच अंतवंत रे।।’’ अनंत तत्त्व सदोदित अनंतच राहातं आणि संकुचित असा प्रपंच हा अंतवंत, नाशवंतच असतो. त्या नाशवंत प्रपंचात राहून जो अनंताचं खरं स्मरण करू लागतो त्याचं जगणं खऱ्या अर्थानं व्यापक, अनंत होऊ लागतं!

-चैतन्य प्रेम

When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…