X

Valentine’s Week 2018 : पूल… एक स्ट्रेंज कथा (उत्तरार्ध)

'कमॉन सावी.... वो नही तो तुम सही'

काही दिवस उलटले होते. सावी तिच्या सो कॉल्ड ब्रेकपमधून बऱ्यापैकी सावरली होती, कामात लक्ष घालू लागली होती. पण, हल्ली ती ट्रेनने प्रवास करु लागले होती… अगदी रोज. आजही तिचं काम आवरलं होतं. तिने नेहमीची ट्रेन पकडली आणि पुन्हा तिच गर्दी तिच्या स्वागतासाठी सज्ज होती. “ओ फ्रिक… अगेन…”, असं म्हणत तिने वेडावाकडा चेहरा केला.

आजही तो ‘कान्ट हेल्प इट’वाला त्याच जिन्याने आला… स्ट्रेन्ज… आज सावी त्याला पाहून हसली. त्यांच्या ओळखीतलं हे पहिलं हसू होतं. दिवस जात होते आणि पूलावरचा हा मित्र आता सावीला आपलासा वाटू लागलेला. अवघ्या काही सेकंदांच्या त्या पूलापुरताच त्यांचा संबंध होता. आता आता तर तो जिन्यावरुन चढल्यानंतर सावीच्या ट्रेनसाठी थांबून असायचा. अर्थात फार वेळ नाही. कारण त्या गजबजलेल्या पूलावर थांबून राहिल्यावर इतर प्रवाशांच्या मत्रपुष्पांजलीचा सामना कोण करणार. त्या गर्दीत तो सावीच्या मागून चालायचा आणि अगदी आपलं कुणीतरी माणूस नीट जावं, अशा प्रकारे तो संपूर्ण पूलावरुन तिची साथ द्यायचा.

सध्या तीसुद्धा बरीच शांत झालेली. नीलचा विचार तर आता दूरदूरपर्यंत नव्हता. आज काम करता करता तिच्या मनात विचार आला…

“खूप झालं आज मी त्याच्याशी बोलणार. अरे नाव तरी कळूदे त्याचं. कमॉन सावी…. वो नही तो तुम सही, कोणालातरी विचारावच लागणार आहे. आज वेळेतच निघायचंय…” सावीने सर्व प्लॅन केला. मनाची तयारी केली. पण, सत्यानाश! केलेले प्लॅन फिसकटलेच नाहीत तर ते प्लॅन कसले. आज तिला निघायलाच नऊ वाजले होते. पुन्हा तिच नेहमीचीच चिडचिडी…

ऑफिसमधून निघताना तिने सिगारेटचं पाकीट घेतलं आणि त्यातून सिगारेट काढत त्याचे झुरके घेत ती रिक्षात बसली. पावसाला सुरुवात झालेली. त्यामुळे सावीचा त्याच्यावरही राग. कारण, रिक्षा ट्रॅफिकमध्ये अडकलेली.

“भैय्या, जल्दी चलो मेरी ट्रेन चली जायेगी”, असं तिने त्या रिक्षावाल्याला सांगितलं. मनातल्या मनात तिने नशीबाला दोष द्यायला सुरुवात केली होती. ती स्टेशनवर गेली आणि ट्रेनमध्ये बसली. बऱ्याच शिव्या देत, पावसाचा राग राग करत ती स्टेशनवर उतरली आणि पूल चढू लागली. आता जवळपास साडेदहा वाजून गेले होते. त्यामुळे त्या पूलावर गर्दीही नव्हती. निराश चेहऱ्याने ती चालू लागली. पाऊस खूप असल्यामुळे तिथेही सर येतच होती. त्यातही वैतागलेली सावी शांतपणे चालत होती.

तितक्यात मागून तिच्या खांद्यावर हॅल्लो… असं म्हणत कुणीतरी थाप मारली. इतक्या उशीरा कोण या अनोखळी ठिकाणी हॅल्लो करतंय, तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने उलटून पाहिलं आणि दोन मिनिटं शांतच झाली. “कहानी मे ट्विस्ट…” हा तोच होता, जो रोज सावीच्या मागे राहून तिला पूल पार करुन देत होता.

‘ब्रिज मेट’च म्हणा हवं तर.

“ओ….. इट्स यू… आय थॉट आप गये होंगे”, खरंतर सावीला हेच हवं होतं. पण, तिने मनातल्या गोष्टी अशा ताडकन न बोलणं योग्य समजलं. तितक्यातच तो म्हणाला, “कैसे जाता, आपको अकेले छोडके….” दोन मिनिटं काय बोलावं हे सावीला सुचलंच नाही. हे काहीसं फिल्मी असलं तरीही खरंखुरं घडत होतं यावरच तिचा विश्वास नव्हता. पावसाच्या आवाजातही तिला शुकशुकाटच वाटत होता. त्याने लगेचच हात पुढे करत म्हटलं,

“मै सौरभ, सौरभ शुक्ला.”

“आय एम सावी…” दोघांनीही रितसर ओळख करुन घेतली आणि पुढे चालू लागले. त्या दिवशी पूल संपताना नेहमीप्रमाणे ते दोघं दोन जिन्यांनी न जाता एकाज जिन्याने गेले. सावीच्या आयुष्यात तिला कधीही न आवडणाऱ्या पावसाने एक नवी पालवी आणली होती आणि यात त्या अनोळखी मनांना जोडणारा तो पूलही तिच्यासाठी खास झाला होता. सावीने तर स्टेटसही अपडेट केलं होतं, “किप काल्म अॅन्ड किप वॉकिंग ऑन द ब्रिज… ;)”.

(उत्तरार्ध)

– तीन फुल्या, तीन बदाम

First Published on: February 12, 2018 1:01 am