सकाळचे बारा वाजले होते. सूर्य डोक्यावर आला होता. मात्र अक्षय अजूनही अंथरुणातच होता. खिडक्यांना असलेल्या पडद्यामुळे सूर्यप्रकाश बेडरूममध्ये येत नव्हता. या अंगावरून त्या अंगावर नुसतं लोळणं सुरु होतं. पण आळस झटकून उठावं असा विचार अजिबात त्याच्या मनात नव्हता. तो आळस त्याला हवाहवासा वाटत होता. तसा आज तो एकटाच घरी होता. त्यामुळं तो एकांत त्याला तिच्या आठवणीत घेऊन गेला. एक एक आठवण समोर येऊ लागली. तिच्या भेटीसाठी नियमित सकाळी लवकर उठणं. जॉगिंग करतो हे तिला माहिती असलेलं खोटं सांगणं आणि त्या बहाण्याने तिच्या ऑफिसपर्यंत तिला सोडणं. उनाडक्या करत फिरलेला काळ. पहिल्यांदा तिच्यासोबत पाहिलेला चित्रपट, त्याच तिकीट काढताना ‘कॉर्नर सीट दे दो’ असं म्हटल्यावर तीन टाकलेला कटाक्ष. आणि मग पैसे कमी आहेत. दाखवत कॅन्सल केलेली कॉर्नर सीट.

डेट वगैरे असं काही माहिती नसताना कशाचीही पर्वा न करता तिच्यासोबत केलेली भटकंती. कडकी असल्यानं तिच्या वॉलेटमधून घेतलेला पॉकेटमनी. मस्ती सोबत तिच्याशी झालेली भांडणं. आणि ते मिटवण्याचं ठिकाण. ते हॉटेल आणि त्यामधील तो ठरलेला टेबल. निर्जीव असला तरी दोघांमधील प्रेमाचा तो साक्षीदार होता. दोघांच्या तीन वर्षांच्या सहवासात अनेक वेळ त्यानं यशस्वी मध्यस्थी केली होती. कितीही छोट असो वा कितीही मोठं भांडण तिथं गेलं कि हमखास मिटायचं. त्यामागचं लॉजिक होतं तिथला मेदू वडा. त्याचा ‘मेंदू वडा’ त्यानं अपभ्रंश केला होता. तो खात खात त्यांच्या मेंदूतल भांडण मिटायचं. कितीतरी दिवसांनी तो त्या परिसरात पुन्हा गेला होता. दिवसभर फिरून परतल्यानंतर अंथरुणात पडला होता. आज शहर तेच होतं. ठिकाणं तीच होती. पण कधीकाळी तासनतास जिथं तो बसायचा. ती सगळी ठिकाण आज अनोळखी वाटत होती. ‘ती’ सोबत नव्हती,. त्यामुळं कदाचित ओळख दाखवत नसावीत. तो मात्र तिला आणि तिची ओळख झालेला तो दिवस विसरला नव्हता. अक्षय तसा खेड्यात वाढलेला. आई-वडील शेती करायचे. पहिल्यांदाच पुण्यासारख्या शहरात तो आला होता. ते ही कायमस्वरुपीच. म्हणजे पुढची तीन वर्षे ग्रॅजुएशन आणि जमलं तर पीजी तिथंच फुल प्रूफ प्लॅन केलेला. गावाकडून येताना त्यानं खूप सारी स्वप्न रंगवलेली होती. अर्थात ती अभ्यास आणि करियर भोवताली होती. पुण्यात त्याचा शाळेतला एक मित्र रहात होता. अमोल एका कंपनीत काम करत होता. आणि हिंजवडीला त्याची कंपनी. त्यामुळे गरवारे कॉलेज त्याला लांब पडायचं. पण दुसरा विलाज नव्हता. ओळखी होईपर्यंत तिथून यावं लागणार होतं. अमोल सकाळीच ऑफिसला जायचा.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

“अक्षय उठ, मी निघतोय. तुझ्याकडे पैसे आहेत ना?”
असा जाता जाता त्यानं विचारलं. अमोलच्या आवाजाने तो उठला.
“अमोलदादा मी कसा जाऊ? म्हणजे कोणत्या मार्गाने मला जवळ पडेल?”
हे विचारून त्यानं रूट कन्फर्म करून घेतला. उगाच चुकायला नको. म्हणून सारी काळजी.
“मला संध्याकाळी यायला उशीर होईल, तू जेवण करून घे”
अमोलने शूज घालतच सांगितलं. त्यानं फक्त होकारार्थी मान हलवली. कॉलेजच्या पहिल्या दिवशी सवयीप्रमाणे एक वही हातात घेतली. पायात चप्पल चढवली आणि कॉलेज गाठलं. लवकर निघाल्याने वेळे अगोदरच तो पोहोचला. कॅम्पसमध्ये गेल्यावर त्यानं वर्ग विचारून घेतला. पार्किंगसमोरून जातना महागड्या गाड्या बघून त्याच्या पायाला स्पीड ब्रेकर लागला. तेवढ्यात एक पोरगी बाजूने गाडीवर गेली. आपण पायी चालत असल्याचा त्याला थोडा संकोच वाटला. त्याच्याकडे दुचाकी नाही म्हणून तसं वाटलं असं नव्हतं. त्यामागचं खरं कारण होतं, त्याला दुचाकी चालवता येत नव्हती. “सगळेच थोडे गाडीवर येतात, एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपल्यासारखे असतील की”

स्वतःच्या मनाची त्याने समजूत घातली. लवकर आल्याने तो कॅन्टीनकडे गेला. चहा घेतला आणि वर्गात येऊन बसला. वर्ग सुरु झालेला नसल्यानं समोरच्या बाकावर काही मुलं गप्पा मारत होती. कॉलेज सुरु होऊन पंधरा दिवस झाले होते. त्यामुळे त्यांची गट्टी जमलेली. हा एकटाच पाठीमागच्या बाकड्यावर बसलेला. शिक्षक आले, शिकवलं आणि निघून गेले. एका पाठोपाठ एक तास झाले आणि पहिला दिवस संपला. तशी दुपार झालेली. पण कॉलेजचा दिवस संपला. पहिल्या दिवशी सारं डोक्यावरून गेलेलं. आडवी रेष वहीवर ओढली नव्हती. रूमवर गेल्यावर स्वच्छ अक्षरात नाव टाकलं, अक्षय देशमुख. अमोलला उशीर होणार होता त्यानं सकाळीच सांगितलं असल्यानं तो जेवून झोपला. सकाळी उठायच्या अगोदर अमोल निघून गेला होता. आज त्यानं जाताना उठवलं नव्हतं. उठून स्वतःचं आवरलं आणि त्यानं कॉलेज गाठलं. दोनचार दिवस निघून गेले. आता तीन चार मित्र झाले होते. त्यांच्यासोबत काही वेळ आणि उरलेला वेळ अभ्यासिकेत. एका कोपऱ्यात तो बसलेला होता.

पण त्याचं लक्ष पुस्तकात नव्हतं. अभ्यासिकेच्या दुसऱ्या कोपऱ्यात एक मॉडर्न पोरगी बसलेली. ब्ल्यू जीन्स, वरती फुल भायाचा मोठ्या चेक्सचा शर्ट. केस खांद्यावर मोकळे सोडलेले आणि डोळ्यावर गॉगल. तसं गावाकडून आलेला हा लाजरा बुजरा पोरींशी बोलावं असं वाटलं तरी हिम्मत कधी होत नसलेला. पण पहिल्यापासून ती डोळ्यासमोरून जात नव्हती. कसं बोलावं हा विचार त्याच्या मनात सतत घोळत होता. ती संधी आपोआप त्याच्यासमोर चालून आली. कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर होणार होतं. आणि ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते अगोदर लेखी द्यायला सांगितलं होतं. मुलांचे त्याला, तर मुलींचे तिला. जमा करायला सांगितलेले. तसे दोघांचे वर्ग वेगवेगळे. मात्र अभ्यासिकेत ही सूचना लिहिलेली. आरती देसाई तिचं नावं. सूचना देताना त्यानं लक्ष देऊन ऐकलेलं. प्रश्न गोळा झाल्यानंतर त्यानं तिला मोठ्या आदबिन प्रश्न विचारला.
“तुमचे झाले गोळा करून?”
तिनं काहीही न बोलता हात पुढे केला. त्याचा दुसरा प्रश्न
“तुम्हीच मॅमकडे देता का? दोघांकडे जमा झालेले”
तिनं मात्र यॉर्कर बॉलवर सिक्सर मारावा असा टोला लगावला.
“मी काय आजीबाई दिसतेय का? तुम्ही म्हणायला.”

त्यावेळी अक्षयला काहीच बोलता आलं नाही. पण न बोलता त्यानंतर तिच्याबद्दल त्यानं बरीच माहिती काढली होती. तिचं नावं आरती देसाई. मूळची ती कोल्हापूरची. छोट्या बहिणी सोबत रूमवर राहते. कॉलेज जवळच तिची रूम आहे. वर्गात टॉप आहे. इंग्लिशवर चांगली कमांड आहे. डान्स आणि बोलण्याची आवड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिंगल आहे. पुढचा रस्ता सगळा क्लिअर होता. दोघांची आता तोंड ओळख झाली होती. पाहायला गेलं तर ती शांत वाटत होती. पण आतमधून रसायन काहीतरी वेगळंच होतं. त्याचा अनुभव त्याला एका स्पर्धेदरम्यान आला. कॉलेजकडून दोघांनी त्या स्पर्धेत पार्टिसिपेट केलं होतं. त्यासाठीचा एंट्री फॉर्म कॉलेजने मेलवर पाठवला होता. तो डाउनलोड करून सबमिट करायचा होता. नेटकॅफेवर बसण्याअगोदर फोन नंबर विचारला जातो. तिने त्याला एका दमात नंबर सांगितला. थोड्यावेळाने आयोजकांजवळ दुसराच नंबर सांगितला. तेंव्हा त्याला काही अंदाज आला नाही. काही दिवसानंतर त्याला कळलं तो सेफ्टी फॉर्म्युला होता. उगाच आपला नंबर ती देत नव्हती. त्याला मात्र खरा नंबर दिला होता. नंबरचा हा फॉर्म्युला अक्षयला ही जाम आवडला. तेवढीच आवडली तिची घड्याळ घालण्याची पद्धत म्हणजे काच खराब होऊ नये म्हणून ती मनगटाच्या आतल्या बाजूने डायल वापरायची.
क्रमशः
– तीन फुल्या, तीन बदाम