तीन दिवसांपूर्वी
“हॅलो, अरे कुठे आहेस कधीपासून फोन करतेय तुला? फोन का नाही उचलत आहेस?”, प्राजक्ता केतनला विचारत होती.
“काही नाही जरा कामात होतो”, केतन बोलला.
पण केतनच्या आवाजात तिला काहीतरी वेगळपण जाणवलं. तो नक्कीच कामात नव्हता.
“काय झालंय केतन, तुझा आवाज नेहमीप्रमाणे वाटत नाहीये?”
“अगं सांगितलं ना कामात होतो”
“केतन, मी तुला खूप आधीपासून ओळखते, तुझ्या साध्या आवाजावरून मी सांगू शकते की तुझं काहीतरी बिनसलं आहे’
“असं काही नाहीये, आणि प्लीज असंसारखं विचारत बसून मला इरिटेट बिलकूल करू नकोस.”
त्याचं शेवटचं वाक्य प्राजक्ताला खूप लागलं. तिने तो विषय तिथेच बंद केला.
“बरं काम झालंय तर आज आपण भेटूयात का? बाहेर कुठेतरी? जेवायलाच जाऊया का त्यापेक्षा?” तिने दुसरा विषय काढला.
“नाही नको, मला वेगळं काम आहे. आपण नंतर भेटू” केतन आणखी वैतागत म्हणाला.
प्राजक्ताला केतनचं वागणं खूपच नवं होतं. केतन यापूर्वी तिच्याशी असं कधीच बोलला नव्हता. मुळातच ती हळवी असल्याने तिचे डोळे भरून आले, शेवटचा एक प्रयत्न म्हणून तिने विचारलं “तू खरंच ठिक आहेस ना रे केतन?”
”प्राजक्ता तुला एकदा सांगून कळतं नाही का? प्लीज ठेव फोन” ती पलीकडून काही बोलणार एवढ्यात केतनने फोन कट केला. प्राजक्ताला काहीच कळलं नाही, अफेअर सुरू झाल्यापासून केतन असं कधीच वागला नव्हता. व्हिडिओ कॉलवर बोलल्याशिवाय केतनची सकाळच व्हायची नाही.
————————-
“प्राजक्ता सकाळी तुझा चेहरा पाहिला ना की दिवस किती मस्त जातो ग माझा, रोज सकाळी व्हिडिओ कॉल करून माझ्याशी बोलत जा” केतन नेहमी सांगायचा. त्याच्या तोंडून हे ऐकताना प्राजक्ता किती लाजायची. असा एकही दिवस गेला नाही की ते दोघंही भेटले नसतील. ऑफिस सुटल्यावर दोघंही भेटायचे खूप गप्पा मारायचे. अन् घरी जायचे आणि आज पहिल्यांदा केतनना भेटायला उत्सुक होता ना बोलायला. प्राजक्ताने डोळे पुसले आणि तिने केतनला फोन केला. पण त्याने काही उचलला नाही. नंतर मात्र त्याचा फोन स्विच ऑफ झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Love Diaries : तू असतीस तर…(भाग १)

दोन दिवसांपूर्वी…
सकाळीच केतनने फोन ऑन केला, ऑन केल्या केल्या ढिगभर मेसेज आले. त्यातून कॉल अलर्टही आले. प्राजक्ताला २१ मिस्ड कॉल होते. प्राजक्ताचे मेसेजही होते पण तो न वाचताच त्याने फोन टेबलवर तसाच ठेवला आणि आंघोळीला निघून गेला.
प्राजक्ता चांगलीच गोंधळून गेली होती. रोज सकाळी व्हिडिओ कॉल करणाऱ्या केतनने फोनही केला नव्हता. असं वागण्याचा त्याचा दुसरा दिवस होता. काय चाललंय तिला कळतंच नव्हतं. “आठवड्याभरापूर्वी तर केतनने लग्नाचा विषय काढला होता, मला कुशीत घेऊन कुरवाळत होता. लग्नात असं करू, तसं करू म्हणत होता आणि आता असं का वागतोय तो? त्याने माझा फक्त त्या गोष्टीसाठी वापर तर केला नाही ना?” एवढा एक विचार करून तिच्या पोटात गोळा आला.
“छे! केतन फसवाफसवी करणाऱ्या मुलांपैकी नव्हता, तो असं कधीही करणार नाही. मी का त्याच्यासारख्या मुलावर शंका घेतेयं?” तिला स्वत:चाच खूप राग यायला लागला. आपण असा विचार मनात आणल्याबद्दल तिने मनोमन केतनची माफी मागितली.
पण भीती तिला शांत बसू देईना. १० वाजून गेले केतनचा अजूनही फोन किंवा मेसेज आला नव्हता. एरव्ही ठिक साडेसहाला फोन करणाऱ्या केतनचा काही पत्ता नव्हता. आपली शंका खरी ठरतेय की काय या विचारानेच ती सुन्न होत होती. तिचं डोकं पार बधीर झालं होतं. कशी बशी ती ऑफिसला पोहोचली. ढीगभर काम पुढ्यात होतं. क्लायंटचे पेमेंट रखडले होती. समोर फाईल्सचा खच होता. तिच्या सहीशिवाय पेमेंट रिलिज होणार नव्हते. बाराच्या आत तिला टेबलवरचं काम संपवायचं होतं. पण काम करण्याची तिची इच्छाच नव्हती. डोक्यात केतनचाच विचार सुरू होता.

एवढ्यात तिचा फोन वाजला. केतनचा मेसेज होता.
“सॉरी, तुझ्यावर चिडायला नको होतं मी. पण काल कामाच्या गडबडीत होतो. तू आता काम कर, तुझ्याशी नंतर बोलतो मी” तिने मेसेज वाचला आता कुठे तिच्या जीवात जीव आला. ती काम करू लागली, पुढे दोन तास काम आटोपण्यात गेले, तिला केतनचा विचार करायला सवड मिळाली नाही. कामातून उसंत मिळाल्यावर तिने फोन हातात घेतला. केतनचे नेहमीप्रमाणे भरमसाठ मेसेज आले असणार त्याला रिप्लाय करायला हवा असं म्हणत तिने फोन हातात घेतला पण तिचा पुरता हिरमोड झाला. केतनचा एकही मेसेज आला नव्हता. केतन असं कधीच करत नाही. तो कितीही कामात असला तरी दर अर्ध्या तासाने तो प्राजक्ताला आवर्जून मेसेज करतो आणि कालपासून चक्रच फिरली होती. तिने केतनचा मेसेज नीट वाचला, तिच्या एक गोष्ट लक्षात आली. केतनने सकाळी उठल्यावर मेसेज केला होता खरा, पण तो नेहमीसारखा केतनचा मेसेज नव्हता. फक्त एक फॉर्मल मेसेज होता.
प्राजक्ताला काहीच कळतं नव्हतं, तिला वेड लागायचं बाकी होतं. तिने पुन्हा केतनला फोन केला. त्याने फोन उचलला पण तो नीट बोलला नाही. त्याचा आवाज कालसारखाच होता.

“केतन काय झालंय तुला कालपासून तू असा वागतोय. तुझ्या वागण्याचा मला किती त्रास होतोय तुला माहितीये ना?”
“असं काही नाहीये प्राजक्ता”
“माझं काही चुकलंय का?”
“नाही”
“मग तुला अचानक काय झालंय? तू कालपासून माझ्याशी नीट बोलत नाहीये.” तिच्या या वाक्यावर केतनने काहीच उत्तर दिलं नाही.
“केतन तू ऐकतोय ना? मी काहीतरी बोलतेयं तू उत्तर का देत नाहीये?”
“प्राजक्ता…” केतनने पलीकडून दीर्घ श्वास घेतला.
“बोल”
“प्राजक्ता प्लीज मला चुकीचं समजू नकोस, पण मला तुझ्यासोबत यापुढे नाही राहता येणार”
“केतन”
“प्राजक्ता, मला माहितीये मी चुकीचं करतोय पण मला माफ कर. मला ही रिलेशनशिप पुढे नाही नेता येणार आपण इथेच थांबलेलं बरं”
प्राजक्ताला विश्वासच बसत नव्हता. “केतन काय बोलतोय. तुझं तुला तरी कळतंय का?”
“हो, पण माझा नाईलाज आहे, मला नाही राहता येणार तुझ्यासोबत’ वाक्य पूर्ण होत नाही तोच पलीकडून केतन रडू लागला, पण त्याचं ऐकणं बहुधा प्राजक्ताच्या कानावर गेलंच नसावं. प्राजक्ताच्या हातून फोन खाली पडला, ती धक्क्याने खाली कोसळली. केतनशी लग्न करण्याचा तिचा विचार पक्का होता. सगळं जुळूनही आलं होतं. दिवाळीत लग्न करण्याचं दोघांचं ठरलं आणि अचानक असं काही होईल याची तिला कल्पनाही नव्हती. ती चक्कर येऊन ऑफिसमध्ये कोसळली. तिला ऑफिसमधल्या एका मैत्रिणीने घरी सोडलं. रात्री उशीरा कधी तरी तिला जाग आली तिच्या रूममध्ये ती होती. आई तेवढी बाजूला बसून होती. उठून बसल्यावर चित्त थाऱ्यावर यायला तिला बराच वेळ लागला. दुपारी काय झालं ते तिला आठवलं. ती बेडवरून खाली उतरली, फोन शोधू लागली.
तिचा फोन स्विच ऑफ झाला होता. ती पुटपुटायला लागली. “नाही राहायचं म्हणजे काय? असं कसं नाही राहायचं?” तिने फोन ऑन केला. पहाटेचे तीन वाजले होते. फोन करून उपयोग नव्हता केतनने तो उचलला नसता. तिने फोन तसाच आदळला डोळे मिटून तशीच पडून राहिली. केतन जे काही बोलला ते आठवून तिला रडू येत होतं.
(क्रमशः)
– तीन फुल्या, तीन बदाम

मराठीतील सर्व लव्ह डायरिज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive love stroies love diaries season two break up love story
First published on: 01-08-2017 at 01:23 IST