“दे ना सोडून… तुला अक्कल नाहीये का? बिनडोक आहेस तू! प्रेम वगैरे काही नसतं…”
कोणीतरी तिला समजावत होतं… ओरडून ओरडून सांगत होतं.
“बघ, तो तुला सोडून गेलाय… एक दिवस अचानक, काहीही न सांगता… त्यानंतर त्याने तुला स्वत:हून कधीच फोन केला नाही, ना मेसेज केला. तुला वेड लागलं होतं.”
“अगं दीड वर्षांपूर्वी काय झालं होतं माहितीये ना तुला? ट्रिटमेंट सुरू होती तुझी. विसरलीस का? चांगली नोकरी होती. ती ही घालवलीस.. रात्री अपरात्री शुन्यात कुठंतरी बघत बसायची. रात्र रात्र झोपायची नाहीस… कुठंतरी भटकायची… आठव सगळं… तेव्हा मी मी… आणलं तुला सगळ्यातून बाहेर… किती फोन केले त्याला तू? पण दाखवली का माणूसकी त्यानं? तू जीव द्यायला निघाली होतीस तेव्हाही आला नाही तो… मग आता त्याला मदत हवी आहे तर तू का जातेस? दे सोडून त्याला… नाहीतर मर मग राहा तशीच.”
तिची मैत्रिण तिच्यावर भडकली आणि निघून गेली. कार्तिका तरीही शून्यात बघत बसून होती. आतापर्यंत डोळ्यात साचलेले पाणी तिच्या डोळ्यातून वाहू लागलं. समुद्र किनाऱ्यावर ती बसली होती. लाटांसारख्या भूतकाळातल्या आठवणी मनाच्या किनाऱ्यावर येऊन धडकत होत्या आणि पुन्हा त्या आठवणीच्या खोल खोल समुद्रात तिला घेऊन जात होत्या…
“ती म्हणाली दे सोडून त्याला… खरंच शक्य आहे का?”, कार्तिका विचार करत होती.
दीड वर्षांनंतर त्यानं पहिल्यांदा मला मेसेज केला होता.
‘Hi, how are u? मला माहितीये मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो. गेल्या दीड वर्षांत मी तुला एकदाही फोन केला नाही. तुझी साधी चौकशीही केली नाही. तू कशातून गेली आहे हे सगळं कळलंय मला. शक्य असेल तर मला माफ कर. पण आपण हे सगळं विसरून नव्यानं सुरूवात करुया का? मीही तुला नाही विसरु शकलो. माझीही तब्येत खूप बिघडली आहे. माझंही कौन्सिलिंग सुरू आहे. रात्र रात्रभर झोप नाही लागत. मी जॉबही सोडलाय. कौन्सिलर म्हणत होती की तुला जर कोण ठिक करु शकते तर ती कार्तिकाच आहे… मी तुला त्रास देऊन खूप चूक केली. आता सगळं मी भोगतोय. आयुष्यात काहीच ठिक होत नाहीये. मला आता ते ठिक करायचं आहे. प्लीज शक्य असेल तर मला रिप्लाय कर मी वाट बघतोय…”
आज तो आयुष्यात नसला तरी त्याचा नंबर तिच्याकडे होताच. तिचा विश्वास बसत नव्हता. रात्री अडीच वाजता त्याचा मेसेज आला होता. “काय करावं? रिप्लाय द्यावा की नको? अशी मनःस्थिती तिची होती म्हणून तिने नितीला फोन केला होता. निती तिची खूप जवळची मैत्रिण. पण आज ती दे सोडून त्याला असा सल्ला देऊन निघून गेली होती.
“करु का त्याला माफ?”
“पण का करायचं त्याला माफ? नितीबरोबर बोलत होती? मला तो का सोडून गेला हे त्यानं मला कधीच सांगितलं नाही. तो ज्या परिस्थितीत आहे मीही त्यातून गेले आहे. मी त्याच्याकडं तर अक्षरश: भीक मागितली होती. पण, तेव्हा तो कधीच आला नाही. ऑफिसच्या वॉचमनला तर मी त्याच्या ऑफिसच्या आवारात दिसले तर सरळ तिला हाकलावून लावायचं असंही त्याने बजावलं होतं. त्याच्या सगळ्या मित्रांनी तर मला फेसबुक, व्हॉट्सअॅप अगदी फोनकॉलवरही ब्लॉक केलं होतं. ही सगळी मंडळी माझ्याशी तर चांगली बोलायची पण एका रात्रीच सगळी फिरली होती. असं काय झालं होतं? याचं उत्तर मला दीड वर्षांत कधीच मिळालं नाही.”
……………………….
पार्थ आणि कार्तिका यांचं प्रेमप्रेकरण सगळ्यांनाच माहिती होतं. ते दोघंही मेड फॉर इच अदर आहेत असेच सगळे म्हणायचे. कार्तिकाचं पार्थशिवाय पानच हलायचं नाही. मुळात एकलकोंडी असलेल्या कार्तिकाला फक्त एकच मैत्रिण होती ती म्हणजे निती. पार्थ तर तिचं आयुष्य होतं. कार्तिकाच्या आवाजावरुन तिच्या मनात काय चालू आहे, हे पार्थला माहिती असायचं. आई-बाबांशी कार्तिकाचं पटायचं नाही. त्यामुळं तिच्यासाठी आई-बाबा, मित्र, प्रियकर अशा साऱ्या भूमिका पार्थने बजावल्या होत्या. एके दिवशी बोलता बोलता ‘थांब तुला पाच मिनिटांनी फोन करतो’ असं म्हणून त्यानं फोन ठेवला तो आयुष्यात कधीच स्वत:हून फोन केला नव्हता.
सूर्य कधीच अस्ताला गेला होता. कार्तिका तिथेच बसून होती. अजूनही त्याला रिप्लाय करावा की करु नये, याचा निर्णय होत नव्हता. एव्हाना खूप जोराचा वारा वाहू लागला होता. या थंड वाऱ्यासोबत काही आठवणीही तिला झोंबू लागल्या पुन्हा आठवणीच्या खोल समुद्रात ती बुडाली. सहा महिन्यांपूर्वीच तिला पार्थचे सोडून जाण्याचं कारण कळलं होतं.
६ महिन्यांपूर्वी…
पार्थ प्रकरणातून कार्तिका हळूहळू सावरायला लागली होती. मानसिक त्रासातून तिने नोकरी सोडली होती. मुळात ती हुशार होती त्यामुळं नवी नोकरी तिला महिन्याभरात मिळाली होती. आता पार्थ प्रकरण तिच्यासाठी कायमचं बंद झालं होतं. हे काम नीट करायचं खूप खूप पुढे जायचं. स्वत:साठी काहीतरी करायचं तिने पक्क ठरवलं होतं. नोकरीचा पहिलाच दिवस होता कार्तिका ऑफिसमध्ये आली. सगळे छान बोलले तिच्याशी. सगळ्यांशी तिने ओळख करुन घेतली. शेवटी एका मुलाच्या डेस्कपाशी ती पोहोचली. तिच्यापेक्षा तो थोडा मोठा होता.
“hi! मी कार्तिका.. आजच जॉईन झालेय.” पुढं आपल्या कंपनीचं नावही तिनं सांगितले. पण त्यावर स्वत:चं नाव सांगण्यासाठी त्यानं तोंडच उघडलं नाही. कार्तिकाकडं धक्का लागल्यागत तो बघत होता
“hi काय झालं? सगळं ठिक आहे ना?”
“excuse me!” असं बोलून तो निघून गेला. त्याला काय झालं कार्तिकाला कळलंच नाही. ती आपल्या जागेवर जाऊन काम करत बसली. तेवढ्यात कोणीतरी ओरडलं. “यश अरे काय करुन ठेवलंस तू ? कामात एवढी मोठी चूक? तुला बरं वाटत नसेल तर घरी जा मगासपासून कामात चुका करतोय तू. तूझ्याकडून या अपेक्षा नाहीत.”
“अच्छा! तर याचं नाव यश आहे” कार्तिका पुटपुटली. तो उठला आणि सिगारेट ओढायला बाहेर गेला. पुढं घर आणि ऑफिस असं सगळं सुरू होतं. ऑफिसमध्ये सगळं छान बोलायचे पण यश कधीच कार्तिकाशी बोलायला आला नाही. तिला बघूनच तो पळ काढायचा. पार्थ प्रकरणातून कार्तिका सावरत होती. पण सारखी त्याची आठवण तिला यायची. शक्य तेवढं तिने कामात स्वत:ला गुंतून ठेवलं होतं.
“कार्तिका, तू आता यशच्या टीममध्ये काम करणार आहेस. यश चांगला मुलगा आहे. शिकून घे त्याच्याकडून..”, बॉस म्हणला. कार्तिकानं मान डोलावली. “हा यश माझ्याशी बोलत पण नाही, मला बघून रस्ता बदलतो. मला काय शिकवणार देव जाणे…” कार्तिका स्वत:शी पुटपुटली. रात्री कार्तिका आणि यश एका प्रोजेक्टवर काम करत बसले होते. यशचा फोन सारखा वाजत होता. फोन बघून तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. त्यानं फोन डेस्कवर आदळला आणि सिगारेट फुंकायला निघून गेला.
कार्तिकाचं वाजणाऱ्या फोनकडं लक्ष गेलं. स्नेहा नावाच्या मुलीचा सारखा फोन येत होता. त्यावर तिचा फोटोही होता. कार्तिकानं नीट फोटोकडे पाहिलं. “स्नेहा.. स्नेहा.. नाव ओळखीचं वाटतंय.. ” अरे हो! ही तर तीच स्नेहा पार्थच्या ऑफिसमध्ये काम करते. पार्थच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी भेटले होते तिला.
“अच्छा! हा यश स्नेहाचा बॉयफ्रेंड आहे तर…”, तिला पटकन आठवलं आणि हसू अनावर झालं. ‘स्नेहा एकदम बोल्ड होती. मैत्रिणीपेक्षा तिला मित्रच अधिक. दिसायला सुंदर होती म्हणून पार्थचं अर्ध ऑफिस तिच्या प्रेमात. पण मी तर पार्थला बजावलं होतं. लांब राहा बाबा या मुलीपासून. मला ती अजिबात आवडली नाही… एक-दोनदा मी तर पार्थशी या मुलीवरुन भांडलेही होते. तेव्हा पार्थ म्हणायचा “अग बॉयफ्रेंड आहे तिचा. यश नाव आहे त्याचं. लग्न पण करतील ते दोघं यावर्षी. तू पण ना! मी का करेन तिच्याशी अफेअर? माझा जीव आहे तू कार्तिका”, कार्तिकाला हसू आलं. आता यश आला की त्याला माझी ओळख सांगते म्हणजे तो आपल्याशी नीट बोलेल. कार्तिका सुखावली. यशशी बोलून पार्थविषयीही काही माहिती मिळते का ते बघू. त्या स्नेहाला नक्कीच माहिती असणार पार्थने माझ्याशी ब्रेकअप का केलं ते?
यश आला.. “hi! तुझा फोन वाजत होता बराच वेळ.” कार्तिकानं यशशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यशनं उत्तर दिलं नाही. कार्तिका पुन्हा यशकडे वळली.
“यश.. तुझ्या गर्लफ्रेंड स्नेहाला मी ओळखते!”
“हो माहितीय..”
कार्तिकाला हे उत्तर अनपेक्षित होते. याला कसं कळलं मी तिला ओळखते?
ती पुढे म्हणाली.
“मी पार्थची… ” शब्द ओठांतच राहिले.
“हो माहितीय…” पुन्हा तेच उत्तर
“एक सांगू का रागवणार नसशील तर?”
“बोल…” यशनं एका शब्दांत उत्तर दिलं. कार्तिकाकडं बघणं टाळत तो आपलं काम करत राहिला.
मला तुझी गर्लफ्रेंड अजिबात आवडायची नाही. कार्तिका हसली.
“हो माहितीय…” यश म्हणाला आणि “स्नेहापासून चार हात लांब राहा असेही तू त्याला बोलली होती हेही मला माहितीय.”
आता कार्तिकाला आणखी एक धक्का बसला. याला कसं एवढं माहिती? तिला काहीच कळत नव्हतं.
पण तिला पार्थविषयी जाणून घ्यायचं होत आणि यात तिला यश आणि स्नेहा नक्की मदत करतील हे तिला माहिती होतं. म्हणून यशशी आणखी बोलण्याचा तिने प्रयत्न केला.
“यश स्नेहा कशी आहे? लग्न कधी करतायत तुम्ही? पार्थ मला एकदा म्हणला होता की या वर्षात तुम्ही लग्न करता आहात?”
आता यशनं हातातलं काम थांबवलं आणि कार्तिकाच्या डोळ्यात पाहिलं. इतक्या दिवसांत पहिल्यांदा यशनं कार्तिकाकडं डोळ्यात डोळे घालून पाहिलं होतं.
“तू मूर्ख आहेस? बेअक्कल बाई? काम करायंच तर कर नाहीतर निघून जा घरी.” यश कार्तिकावर ओरडला.
अशा अनपेक्षित प्रतिक्रियेने कार्तिकाला रडू कोसळलं. यश पटकन पुढे आला शेजारी ठेवलेली पाण्याची बाटली तिच्यासमोर ठेवली.
“पाणी घे… सॉरी मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं. पण तुला खरंच माहिती नाही का स्नेहाच काय झाले ते? की तू माझ्या जखमेवर मीठ चोळतेयं.”
“मला कसं माहिती असणार? पार्थ एकदिवस अचानक माझ्याशी बोलायचा बंद झाला. मला सोडून गेला… का गेला? मी काय केलं? मला काहीच सांगितले नाही. गेल्या वर्षभरात माझे फोनही उचलले नाही.” पुढची सारी काहाणी तिने यशला ऐकवली. हळूहळू कार्तिका शांत झाली.
“माझं जाऊ दे तूझं ब्रेकअप झालं आहे हे मला माहिती नव्हतं. सॉरी कधी ब्रेकअप झालं?”
“१४ ऑगस्ट” यश म्हणला.
“काय? कार्तिकाला धक्का बसला. “कसं शक्य आहे पार्थही माझ्याशी तेव्हापासूनच बोलत नाही. १४ ऑगस्टला आम्ही शेवटचं बोललं होतो.” कार्तिका आश्चर्यानं यशकडं बघत बोलली.
“हो कार्तिका माहिती आहे सगळं मला…” यश शांतपणे म्हणाला. आता मात्र कार्तिकाचा पुरता गोंधळ उडला होता. काय चाललंय हे तिला कळतंच नव्हतं. दोघांचं एकाच दिवशी ब्रेकअप कसं काय होईल? काय योगायोग आहे हा..
“यश, प्लीज मला सांग तू नक्कीच माझ्यापासून काही तरी लपवतोयस. प्लीज पार्थच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींनी मला आधीच ब्लॉक केलंय. मला वर्षभरात काय घडलंय ते काहीच माहिती नाही. प्लीज, यश तूला नक्कीच यातलं काहीतरी माहितीय जे तू माझ्यापासून लपवतोयस.” कार्तिकाचा ताबा सुटला.
“कार्तिका, मी तुला नक्कीच सांगेल पण मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय.” यश म्हणाला
कोणतं प्रॉमिस?
“तू स्वत:ला काही करून घेणार नाही.”
“हो दिलं प्रॉमिस. आता काय करायचं बाकी आहे. माझा अंत नको पाहूस प्लीज सांग मला.”
“कार्तिका स्नेहानं मला सोडलं, तिचं आणि पार्थचं अफेअर सुरू आहे.”
कार्तिकाला यशवर विश्वासच बसत नव्हता.
“कार्तिका, पार्थ आणि स्नेहा खूप आधीपासून एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पार्थसारखा स्नेहाला फोन करायचा. तिला रात्रीचे मेसेज करायचा. मी दोनदा स्नेहाला पकडलंही होतं. ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. पार्थचं डबल डेटिंग सुरू होतं आणि स्नेहाचंही. पण हे आपल्या दोघांना कधीच कळलं नाही. स्नेहा सुंदर आहे त्यामुळं तिच्या प्रेमात पार्थही पडला तर नवल वाटून घेऊ नकोस. स्नेहाची स्वप्नं खूप मोठी होती आणि तिची स्वप्न पार्थ पूर्ण करु शकतो याची तिला खात्री पटल्यानं तिनं मला सोडलं. जिच्यावर अख्ख ऑफिस फिदा होतं ती आपल्या प्रेमात पडली याचा आनंद पार्थला होता. १४ तारखेला स्नेहानं मला सोडलं आणि ती पार्थच्या घरी गेली. त्याचदिवशी पार्थनंही तुला त्याच्या आयुष्यातून कायमचं डिलिट केलं. आता पार्थ आणि स्नेहा एकत्र आहेत. तुला स्नेहा आवडायची नाही हे स्नेहाला माहिती होतं. म्हणूनच पार्थसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यावर तिने पार्थला तुझ्याशी कधीही न बोलण्याची आणि तुझं तोंडही न पाहण्याची अट घातली. पार्थनंही ती मान्य केली म्हणूनच त्यानं तुला कधीही फोन केला नाही, तू जीव द्यायला निघाली होतीस अगदी तेव्हाही. कारण त्याला तुझ्या जीवापेक्षा स्नेहाचा शब्द महत्त्वाचा होता.”
कार्तिकापुरती कोलमडून पडली. पार्थनं तोंड फिरवलं असलं तरी तो विश्वासघात करेल, असं तिला कधीच वाटलं नव्हतं. गेल्या दीड वर्षांपासून ज्या प्रश्नाची उत्तरं ती शोधत होती, त्याचं उत्तर इतक्या अनपेक्षितरित्या समोर येईल, असे तिला कधीच वाटलं नव्हतं. यश असा भेटेल आणि असं काही चित्र असेल याची स्वप्नातही तिने कल्पना केली नव्हती. तिने डोळे पुसले आता रडून काहीच उपयोग नव्हता. तिने पार्थला शेवटचा मेसेज केला.
“पार्थ, माझ्याशी न बोलण्याचं खरं कारण मला आज कळलं. जिथं असशील तिथे सुखी राहा. फक्त एकदा खरं कारण सांगितलं असतं तर आज माझंही आयुष्यही खूप चांगलं असतं रे.. bye. all the best for your new life. take care”  त्यानंतर कार्तिकानं कधीच त्याचा विचारही मनात आणला नाही.
…………………………..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोन वाजला आणि कार्तिका भानावर आली. नितीचा फोन होता. “कुठे आहेस कार्तिका? सॉरी, मी तुला असं सोडून जायला नको होतं. तू घरी पोहोचलीस का?” नितीचा आवाज रडवेला झाला होता.
“निती काळजी करु नकोस. मी ठिक आहे. अजूनही मी किनाऱ्यावर बसले आहे. जाईल थोड्यावेळानं घरी”
“नको तू आहेच तिथं थांब. मी दहा मिनिटांत गाडी घेऊन तिथं येते’
दहाव्या मिनिटाला निती आली. कार्तिकाला गाडीत बसवलं आणि तिच्या बिल्डिंग खाली सोडून निती निघून गेली.
कार्तिका लिफ्टची वाट बघत होती. एवढ्यात मागून आवाज आला.
कार्तिका…
कार्तिकाला धडधडू लागलं. आवाज खूप ओळखीचा होता. धीर एकवटून ती मागे वळली. तिला जी व्यक्ती अपेक्षित होती, ती तिच्या समोर होती. तो पार्थ होता. पार्थ गेल्या चार-पाच तासांपासून तिची बिल्डिंगखाली वाट बघत होता.
डोळ्याखाली दिसणारी काळी वर्तुळं तो रात्रीचा झोपत नाही, हे साफ सांगत होती. खूपच बारिक झाला होता तो. आजारपणातून तो उठला होता असं दिसत होतं.
“कार्तिका, प्लीज पाच मिनिटं बोलायचं आहे. बोलू का? चार तासांपासून तुझी वाट बघत थांबलो आहे.”
कार्तिकानं मूक संमती दर्शवली.
“कार्तिका, मला माहीतीये मी खूप मोठी चूक केली. तू मला सारखी फोन करायची. तू जीव द्यायला निघाली होती पण मी एकदाही तुझ्याकडे आलो नाही. तू खूप रडायची, सारखी ऑफिसखाली माझी वाट बघत बसायची पण वॉचमनने तुला अनेकदा हाकलवून दिलं. मी तुझे फोन ब्लॉक केले. तुझा विचारही न करता मी निघून गेलो. तुला माझी जेव्हा गरज होती, तेव्हा मी आलो नाही. पण, आता मला प्लीज एक संधी दे. मी सगळं नीट करेन. आपण पहिल्यासाखं राहू. फक्त तू आणि मी.. प्लीज आपण लग्न करु. मी तुला सांभाळेन. तू फक्त हो बोल गं प्लीज… मला वेड लागायची वेळ आलीये, सायकॅट्रिस्टकडं जातोय. जॉब सोडलाय, रात्रीची झोप लागत नाही गं. कुठं कुठं भटकतोय. प्लीज सगळं सोडूया नव्यानं सुरूवात करुया.” पार्थ रडायला लागला.
“तू बोलतोस ते ठिक आहे पण स्नेहाच काय?”
“स्नेहाशी माझं नाही पटतं, मी तिच्यासाठी तूला हर्ट केलंय खरंच चुकलो मी.”
“अच्छा तर आता स्नेहाशी पटत नाही म्हणून तुला माझी आठवण आली. पटलं असतं तर मी आठवलेच नसते. हो ना?”
पार्थ काहीच बोलला नाही.. त्याच्या न बोलण्यात सारे काही आलेच.
कार्तिकानं एकटक त्याच्याकडं पाहिलं आणि गेले दीड वर्ष मनात ठेवलेला राग उफाळून आला.
“पार्थ जेव्हा मला गरज होती तेव्हा तू एकदाही आला नाहीस. साधी माणुसकीही दाखवली नाही. आता तुला गरज आहे तेव्हा मी आठवले. खूप खोटं वागलास. तुझी शिक्षा आज तूला मिळाली. चालता हो आणि यापुढे मला कधीच तोंड दाखवू नकोस. तू मरताना तुझी शेवटची इच्छा जरी मी तुला माफ करावं, अशी असली तरी मला ते शक्य नाही मी तुला कधीच माफ करणार नाही.”
कार्तिका लिफ्टमध्ये चढली, खूप दिवसांचं मनावरचं ओझं रिकामी झालं होतं… कारण नितीनं सांगितलं तसं आज तिनं खरंच त्याला मनाच्या कप्प्यातून हद्दपार केलं होतं…
– तीन फुल्या, तीन बदाम

मराठीतील सर्व लव्ह डायरिज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive marathi love stories breakup patchup love in mumbai
First published on: 15-02-2017 at 01:15 IST