विनायक परब

यंत्रांना किंवा खास करून संगणकाला प्राप्त होणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आता कोणत्या दिशेने जाणार, या आलेल्या तंत्रज्ञानाच्या लाटेमध्ये माणूस भुईसपाट होणार की वाहून जाणार, याची चिंता जगभर व्यक्त होत आहे. त्याचे धक्के हळूहळू माणसाला बसू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांत यंत्रे अधिक स्मार्ट झाल्यामुळे नोकऱ्या गेलेल्यांच्या संख्येमध्ये वाढच झाली आहे. सारे काही ‘माहिती तंत्रज्ञाना’वर आधारलेले असणार, असे म्हणून त्या क्षेत्रात लाखोंच्या संख्येने भरती झाली; पण ‘डिजिटल’ची लाट आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत तेवढय़ाच मोठय़ा संख्येने नोकऱ्या गमावण्याची वेळ अनेकांवर आली आहे. अनेक व्यवसाय या तंत्रज्ञानाच्या लाटेमध्ये नामशेष झाले. लेथ मशीन किंवा टायिपग शिकणे म्हणजे आयुष्यभराची नोकरीची सोय असे एके काळी मानले जात होते. मात्र आता हे दोन्ही व्यवसाय अस्तंगत झाले आहेत. जग वेगात बदलते आहे. या वळणावर यंत्रेच हुशार झाली तर माणसाने काय करायचे, हा यक्षप्रश्न भेडसावतो आहे.

गॅरी कास्पारोव्हने ‘डीप ब्लू’ या संगणकाला बुद्धिबळात हरविल्यानंतर १९९६ सालापासून ही चर्चा सुरूच आहे. आता तर ती चालकरहित गाडय़ांपर्यंत येऊन ठेपली आहे. त्या संदर्भात भय व्यक्त करणारे संदेशही समाजमाध्यमांवर फिरत असतात. टेस्लाच्या गाडीसमोर अचानक एक लहान मूल आणि वृद्ध आले तर ते वाहन कोणता निर्णय घेणार? भविष्य असलेल्या लहान मुलाला वाचविणार की कमी दिवस राहिलेल्या वृद्धाचा अपघात होऊ देणार?

अशा अनेक प्रश्नांनी सध्या एक मळभ दाटले आहे. त्यात व्यवसाय किंवा नोकऱ्या गमावण्याची शक्यता माणसाला अस्वस्थ करून सोडते आहे. काही जण तर अगदी टोकाला जाऊन विचार करतात की, यंत्रांनीच हे जग ताब्यात घेतले आणि माणसाला गुलाम केले तर? युक्तिवादात एवढे टोक गाठण्याचीही काही आवश्यकता नाही. गरज आहे ती, विषय समजून घेण्याची. मात्र यंत्र कितीही हुशार झाले तरी माणसाकडे असे काय आहे की, त्यामुळे तो वेगळा ठरतो हे समजून घ्यावे लागेल. त्यासाठी मानवी विचारपद्धती आणि मेंदू नेमका कसे काम करतो, जाणिवेच्या पातळीवर माणूस कसा वेगळा आहे आणि त्याची ज्ञानाची आणि शिकण्याची प्रक्रियाही किती व कशी वेगळी आहे, ते जाणून घ्यावे लागेल.

पंचसंवेदनांच्या माध्यमातून होणाऱ्या जाणिवेतून, त्याच्या स्मृतिपटलावर पूर्वी उमटलेल्या प्रतिमा-रूपके-प्रतीके यांच्या माध्यमातून पूर्वानुभवाच्या आधारावर त्याचा एक दृष्टिकोन किंवा मत तयार होते आणि त्यातून तो शिकत जातो, अशी ज्ञानाची साधारण धारणा आहे.

लहान मूल त्याच्या जन्मानंतर प्रथम डोळे उघडते किंवा काही ऐकते तेव्हा तो त्याच्या ज्ञानाचा पहिला क्षण असतो. पण कशाचे ज्ञान झाले आहे हे त्याला कळत नाही. त्यानंतर आई-वडील त्याला विविध अवयव दाखवून विशिष्ट शब्दोच्चारण करत त्याला ज्ञान देण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतात. मग पाहुण्यांसमोर डोळे दाखव कुठे आहेत, नाक दाखव अशी त्याची परीक्षाही बालपणी घेतली जाते. ज्ञान ही त्या लहान मुलासाठी एक अमूर्त प्रक्रिया असते. त्याला शब्दांशी अर्थ आणि वेगवेगळे संकेत आणून जोडले जातात. नंतर झाड असा शब्द उच्चारला तरी त्याच्या नजरेसमोर झाडच येते कारण झाड या संकल्पनेचा परिचय त्याला झालेला असतो. याचाच दुसरा अर्थ असा की, आपली ज्ञानप्रक्रिया ही संकल्पनेवर आधारलेली आहे. आपली विविध मते तयार होतात त्यामागेही ही संकल्पनाच कार्यरत असते. संकल्पनाच मुळात चुकली तर ज्ञानप्रक्रियाही चुकू शकते. हा विचार करतो तो बुद्ध होतो आणि गोष्टी ज्या जशा दिसतात तशा ‘सम्यक दृष्टी’ने पाहायला शिका, असे सांगतो. म्हणजे मोबाइल ही केवळ वस्तू आहे. मात्र त्याला आकार, रंग, रूप प्राप्त होते तेव्हा आपली त्या वस्तूशी एक जवळीक निर्माण होते आणि त्याला भावना येऊन चिकटतात. त्या भावनांमधून सुख-दु:ख निर्माण होते. मात्र मोबाइलकडे मोबाइल म्हणून न पाहता केवळ वस्तू म्हणून पाहा, असे बुद्धाचे तत्त्वज्ञान सांगते.. या पातळीवर माणूस यंत्रापेक्षा वेगळा ठरतो. कारण इथे जाणिवेची पातळी नेणिवेच्याही पातळीपेक्षा खूप वेगळी असते. कारण मुळातूनच ज्ञानाची प्रक्रिया वेगळी आहे.

माणसाच्या ज्ञानप्रक्रियेतील वेगळेपण म्हणजे एकाच वेळेस परस्परविरोधी शक्यतांचा विचार. आता असा विचार करवून घेण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे यंत्रांसाठी विकसित करण्यात आली आहे. कारणमीमांसा आणि अर्थनिष्पत्ती हीदेखील मानवी ज्ञानप्रक्रियेची आणखी दोन महत्त्वाची अंगे आहेत. यातील कारणमीमांसा संगणकीय तर्काच्या माध्यमातून यंत्रांकडे आली आहे. आलेले नाही ते या प्रक्रियेतून माणसाचे होणारे शिक्षण आणि अर्थनिष्पत्ती.

इथे हेही एक लक्षात घेणे आवश्यक आहे की, माणूस शिकतो तेव्हा फक्त एकच एक विषय शिकत नाही, तर पूर्वानुभवाच्या संदर्भातील त्याचे दृष्टिकोनही या ज्ञानप्रक्रियेत बदलत असतात. संगणकाच्या बाबतीत मात्र हा सारा बदलणारा डेटाच असतो. संगणकाला या डेटामधून माहिती मिळते आणि त्याचे विश्लेषण करून त्याची निर्णयप्रक्रिया गणिताच्या आधारे पार पडते. पण त्यात शिकणे किती असते, हा प्रश्नच आहे. आता येणाऱ्या काळात सारे काही संवादरूपी, आवाज किंवा वाचिक शब्द यांच्या माध्यमातून होणार आहे. आवाज हेच चलन असेल, पण मग संवादात एखाद्याने काहीच न बोलण्याची भूमिका वठवली तर? माणसाला न बोललेलेही कळते, ते संगणकाला कळणार आहे का? एखाद्या गोष्टीचा अभाव आहे, हे संगणकाला कळेल; पण अभाव हाही एक भाव आहे, हे तत्त्व त्याला कसे कळणार? त्यासाठी त्याला तत्त्वज्ञ नागार्जुन व्हावे लागेल.

संवादामध्येच नव्हे तर ज्ञानाच्या प्रक्रियेतही शब्द आणि भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणूस जाणीव व नेणीव या दोन्ही पातळ्यांवर शब्दच्छटा समजून घेत असतो. किंबहुना म्हणूनच प्राचीन भारतीय तत्त्वपरंपरेमध्ये एका विचारशाखेने ढोबळमानाने असेही म्हटले आहे की, ज्ञान म्हणजे शब्द आणि वस्तू यांमधील नाते समजून घेणे. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, माणसाच्या विचारप्रक्रियेवर भाषेचा सर्वाधिक प्रभाव असतो. त्याची शब्दरचना, वापरले जाणारे व्याकरण केवळ मेंदूची विचारपद्धतीच ठरवत नाही, तर त्याच्या सवयी आणि वर्तनावरही मूलगामी परिणाम करते. ज्ञानाच्या प्रक्रियेत भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भाषा हा मानवाचा सर्वात मोठा क्रांतिकारी शोध आहे. आजच्या ज्ञानप्रक्रियेच्या मुळाशी तीच तर आहे. संगणकीय भाषेत हा पैस नाही.

शिवाय माणूस वेगळा ठरतो तो त्याच्या लहरीपणामुळे. कोणता माणूस केव्हा, कसा निर्णय घेईल हे कधीच सांगता येत नाही. प्रसंगी स्वत:ला दरीत लोटणारा पर्यायही माणूस जाणीवपूर्वक स्वीकारतो. त्याच्या अनाकलनीय निर्णयप्रक्रियेमुळेच हर्मेन्युटिक्स नावाची नवी विज्ञानशाखा जन्माला आली. हे संगणकाच्या बाबतीत केवळ अशक्य आहे. हीच अनाकलनीयता त्याच्या वर्तनावर कसा परिणाम करते हे समजून घेण्यासाठी संगणकाधारित अ‍ॅनालेटिकल डेटा सायन्स अस्तित्वात आले आहे आणि मानवाचा अधिकाधिक डेटा जमा करून त्याच्या आधारे फायदेशीर ठरतील अशी उत्पादने तयार करून बक्कळ फायदा कमावण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला आहे. त्याचा वापर अनेक संशोधनांमध्येही होतो आहे, तो कल्याणकारी आहे. मात्र प्रामुख्याने आणि आधिक्याने वापर होतो आहे तो उत्पादनांसाठी वर्तन समजून घेण्याच्या दृष्टीने.

माणसाचा स्वत:शीच एक संवाद नित्यनेमाने सुरू असतो. त्याला प्रश्न पडतात, तो उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. अलीकडे संगणकालाही प्रश्न पडतात, तोही उत्तरे शोधतो. मात्र दारासमोर सारी सुखे उभी असतानाही माणूस सर्वसंगपरित्याग करून सत्याच्या शोधात बाहेर पडतो, तसा संगणक सत्याच्या शोधात सर्वसंगपरित्याग करून बाहेर पडू शकत नाही; पण म्हणूनच माणूस बुद्ध होऊ शकतो, संगणक नाही! भविष्यात काय होणार, या चिंतेचे मळभ दूर करायचे तर यंदाच्या दिवाळीत माणसाच्या ज्ञानपरंपरेचे प्रकाशतोरण बांधायला हवे!

दीपावलीच्या अनंत शुभेच्छा!