दीपक योहानन
आवडते शो एकामागोमाग बघणं, जिमला जाणं व तंदुरूस्त राहण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणं मंत्र बहुतेक सगळ्या तरुणांचा असतो. मजेत राहण्यासाठी, काळाबरोबर राहण्यासाठी व तंदुरुस्तीसाठी हा चांगला मार्ग आहे. पण कदाचित एवढं पुरेसं नाही! धोक्याची कल्पना असणं हा ही दैनंदिन आयुष्याचा भाग असण्याची गरज आहे, विशेषत: ज्यावेळी याचा संबंध पैशाशी येतो. वय व उत्पन्न काहीही असो, आरोग्याशी संबंधित तातडीची स्थिती कुणावरही व कधीही येऊ शकते. त्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम व आयुष्य यांचा मेळ घालताना होणारे तणाव व जीवनशैलीतील बदल आपल्यापैकी अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असतात. वैद्यकीय सोयीसुविधा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे पण त्याचवेळी कोविड-१९ सारख्या नवे आजारदेखील वाढत आहेत. या सगळ्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे आरोग्यावर होणारा वाढता खर्च.
म्हणून, वाढत्या आरोग्याच्या खर्चावरील सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे आरोग्य विमा विकत घेणे आणि मनाची शांती मिळवणे. आरोग्य विम्याच्या एकूण रकमेच्या (हमी असलेली रक्कम) केवळ काही अंश रक्कम प्रीमियमपोटी भरून तुम्ही याची खात्री करता की विमा कंपनी पॉलिसीधारकाच्या वतीनं हॉस्पिटलंची बिलं भरेल. पण, अशी एक सर्वसामान्य समजूत आहे की – “मी तरूण आहे निरोगी आहे, मग मी कशाला आरोग्य विमा घेऊ?” आपण बघुया की आरोग्य विमा लवकर घेण्याचं काय महत्त्व आहे हे तरूणांना का समजायला हवं.
चांगली क्लेम हिस्टरी तयार करणे
ही सिद्ध झालेली गोष्ट आहे की आरोग्य विमा काढण्याची योग्य वेळ तेव्हा असते जेव्हा ती व्यक्ती निरोगी असते, शरीराचे सगळे अवयव सुदृढ असतात. तुम्ही जर तरूण व निरोगी असाल तर केवळ प्रीमियम कमी असतो एवढंच नाही तर विम्याचा दावा करायला लागण्याची शक्यताही तमी असते. ही एक पर्वणी असते कारण विमा कंपनीसोबत तुम्ही चांगली क्लेम हिस्टरी तयार करता.
बोनसची कमाई
वर्षामध्ये जर एकही क्लेम नसेल तर, त्या व्यक्तिला नो क्लेम बोनस (एनसीबी) चा लाभ मिळतो. पॉलिसीधारक म्हणून प्रत्येक क्लेम-प्री वर्षासाठी कुठल्याही अतिरिक्त शुल्काखेरीज वाढीव कव्हरेज मिळतं! काही काळानं कव्हरेजची किंमत वाढतच राहते. हा केवळ निरोगी राहण्यामुळेच नाही तर विमा कंपनीबरोबर पॉलिसीत सातत्य ठेवल्यामुळेही होणारा फायदा असतो.
आधीच्या आजारांसाठी कव्हरेज
तरूण वयात आरोग्य विमा घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आधीपासून असलेल्या आजारांच्या बाबतीत वेटिंग पीरियड्सचीही काळजी घेतली जाणे हा आहे. पण, वेटिंग पीरियड म्हणजे काय? आरोग्य विम्याच्या योजनांमध्ये, ठराविक किंवा सर्व आजारांसाठी वेटिंग पीरियड्स गृहित असतात, ज्यासाठीही विमाधारकाला विम्याचं संरक्षण मिळतं. काही आजारांसाठी १२-२४ इतका आधीचा काळ कव्हर करण्यात येतो, तर काही आधीपासून असलेल्या आजारांच्या बाबतीत ४८ महिन्यांनंतरचा काळ संरक्षित करण्यात येतो. लवकर आरोग्य विमा घेण्याचा फायदा म्हणजे जसं वय वाढत जातं त्यानुसार आधीच्या असलेल्या आजारांनाही आपोआप आरोग्य विम्याचं संरक्षण मिळत जातं.
अपघात संरक्षण
जसं सगळ्यांना माहित्येय की अपघात हा अपघातानंच होतो, आणि तो कुणाच्याही बाबतीत कधीही होऊ शकतो. कुठल्याही वयाच्या व्यक्तिला दुर्दैवानं अपघात होऊ शकतो आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं. जर आरोग्य विमा असेल तर ती व्यक्ती रुग्णालयाच्या खर्चाची बचत करू शकेल कारण अपघात विमा पॉलिसीच्या पहिल्या दिवसापासून कव्हर केलेले असतात.
करांमध्ये फायदा
जर तुम्ही तरूण व कमावते असाल तर आरोग्य विमा काढल्यास वाढीव फायदा मिळतो तो वेगळाच. आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर इन्कम टॅक्स अॅक्ट, १९६१ अंतर्गत २५ हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळते. जर, पालक मुलांवर अवलंबून असतील पालकांच्या नावे विकत घेतलेल्या आरोग्य विम्यावरील प्रीमियमपोटी ५० हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळते. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजनेअंतर्गत संरक्षण मिळतं. पण लक्षात ठेवा, हे संरक्षण तोपर्यंतच मिळतं जोपर्यंत तुम्ही सेवेत आहात, त्यानंतर मिळत नाही.
आयुष्याची ध्येयं साध्य करणं
आरोग्य विमा लवकर घेण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपापली आर्थिक ध्येयं साध्य करण्याची निश्चिती. आरोग्य विमा नसेल तर रुग्णालयाच्या खर्चापोटी त्या व्यक्तिला केलेल्या सगळ्या गुंतवणुकीवर पाणी सोडायला लागू शकतं. बहुतेक सगळे आर्थिक सल्लागार त्यामुळे सल्ला देतात की दीर्घकालीन ध्येयं साध्य करायची असतील तर बचत सुरू करण्याच्याही आधी आरोग्य विमा विकत घ्यायला हवा.
जाता जाता
महत्त्वाचं म्हणजे, आरोग्य विमा हा केवळ एखाद्या व्यक्तिसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी असतो. तुम्ही तरूण व विवाहित असाल तर फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना या अपेक्षा पूर्ण करते. पण लक्षात ठेवा, तरूण वयात आरोग्य विमा विकत घेणं हे आरोग्याच्या बेभरवशी धोक्यांविरोधात सज्ज होण्यासाठी तरूण वयात तुम्ही उचललेलं पहिलं पाऊल असेल. तुमच्या शरीरावर मेहनत घ्या पण त्याचवेळी मनाच्या शांतीसाठी आरोग्य विमाही विकत घ्या!
(लेखक : दीपक योहानन हे MyInsuranceClub चे सीईओ आहेत)