माहितीच्या अधिकारातून बाब उघड; पाच महिन्यांत पाच कोटींवर तूट

प्रवाशांना आरामदायी प्रवास घडविण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित शिवशाही बसमधून एसटीला भरघोस उत्पन्न मिळाल्याचा दावा केला जातो. मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त अशी परिस्थिती सध्या शिवशाहीची झाली आहे. जून २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत १४ कोटी ६९ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न एसटी महामंडळाला शिवशाहीतून मिळाले होते. मात्र याच कालावधीत शिवशाही चालविताना महामंडळाला २० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

एसटी महामंडळाच्या एकूण १,५०० वातानुकूलित शिवशाही बस टप्प्याटप्यात दाखल केल्या जात आहेत. यामध्ये १,५०० भाडेतत्त्वावर आणि ५०० बस एसटी महामंडळ विकत घेणार आहे. जून २०१७ पासून आतापर्यंत ४०० हून अधिक बस दाखल झाल्या असून यामध्ये २०० पेक्षा अधिक बस भाडेतत्त्वावरील आहेत. उत्तम आसनव्यवस्था असणाऱ्या शिवशाही बस प्रवाशांच्या पसंतीसही उतरल्या. मात्र या बस चालविताना महामंडळाच्या तिजोरीवर भार पडत आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते के.व्ही.शेट्टी यांनी शिवशाही बसमधून जून २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत करारावर घेतलेल्या वातानुकूलित बसवरील खर्च आणि उत्पन्न याची माहिती मागितली होती. त्याला एसटी महामंडळाने उत्तर देताना १४ कोटी ६९ लाख २५ हजार ४४१ रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगितले आहे. तर इंधनापोटी १० कोटी ४९ लाख ६ हजार २१५ रुपये, पथकरापोटी २ कोटी ५१ लाख २ हजार १७ रुपये, प्रति किलोमीटर प्रमाणे दिलेली रक्कम ६ कोटी २४ लाख ७७ हजार ९९१ रुपये आणि शासनास अदा केलेला प्रवासी कर ८० लाख ८० हजार ८९९ रुपये असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट केले आहे. हे पाहता शिवशाहीतून उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत आहे.

* एसटीतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पन्न आणि खर्चाची माहिती ही शिवशाहीच्या करारावरील बसची आहे. यात कंत्राटदाराला ठरवून दिलेला इंधनाचा खर्च प्रमाणापेक्षा जास्त केलेला आहे. तसे झाल्यास तो खर्च कंत्राटदाराकडूनच वसूल करण्याचे कंत्राटातही नमूद आहे. त्यामुळे इंधनावरील खर्च वसूल केला जाईल, असे सांगितले.

* प्रवाशांचा पैसा या बस सेवेवर नाहकपणे खर्च केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एसटी महामंडळाला शिवशाहीतून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार असल्याचे आधीही माहिती असणार. तरीही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केल्याचे दिसते, असे के.व्ही.शेट्टी म्हणाले. तसेच ही माहिती आधीच मागितली असताना ती देण्यास फेब्रुवारी उजाडल्याचे ते म्हणाले.