बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील १० नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे, तर दोन माजी नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. बेकायदा बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांविरोधात तक्रारी आल्या असतील, तर या तक्रारींवर सहा आठवडय़ांमध्ये अंतिम निर्णय घ्या आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास तात्काळ कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी पालिका आयुक्तांना दिले आहेत.
माजी नगरसेवक नरेंद्र गुप्ते यांनी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्याविरोधात बेकायदा बांधकामाप्रकरणी याचिका केली होती. तसेच कारवाई करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने हे आदेश दिले. शेट्टी यांनी नेतिवली परिसरात बेकायदा कार्यालय बांधल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. शिवाय याबाबात पालिका आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावाही करण्यात आला आहे.