विकास आराखडय़ासंबंधी नागरिकांकडून मते, सूचना मांडण्याची सुरुवात मंदगतीने झाली असली तरी गेल्या पाच दिवसांत तब्बल सहा हजार पत्रांचा ढीग पालिकेकडे जमा झाला आहे. यातील दोन हजार पत्रे वांद्रे येथील सेंट अॅनिस चर्चमधून दाखवलेल्या रस्त्यावर आक्षेप घेणारी आहेत. आतापर्यंत पालिकेकडे दहा हजार पत्रे दाखल झाली असून सूचना पाठवण्याची अखेरची तारीख २४ एप्रिल आहे.
शहराच्या पुढील २० वर्षांच्या भवितव्याकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. आरे कॉलनीच्या हरित क्षेत्रावर विकास, रेल्वे स्थानकांजवळ आठपर्यंत चटई क्षेत्र निर्देशांक, खारफुटीची आक्रसलेली जागा अशा अनेक कारणांमुळे वादात अडकलेल्या विकास आराखडय़ात स्थानिक ठिकाणे व रस्त्यांचे नामनिर्देशनही योग्य नसल्याचे दिसून आले आहे. रहिवासी इमारती, धार्मिक स्थळांच्या जागेतून दाखवण्यात आलेले रस्तेही वादग्रस्त ठरले आहेत. अत्यंत किचकट स्वरूपात आणि इंग्रजी भाषेत असलेल्या या विकास आराखडय़ाबाबत सुरुवातीला फारसे मतप्रदर्शन झाले नव्हते. विकास आराखडा १६ फेब्रुवारी रोजी महापौरांना सादर करण्यात आला.