रब्बी हंगामासाठी प्रथमच निर्णय, ३०० कोटी रुपये देणार
राज्याच्या इतिहासात प्रथमच रब्बी हंगामासाठी अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्य़ांतील १०५३ गावांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.
मदतीच्या विविध उपाययोजनांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी विधिमंडळात केली. राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या खरिपाच्या १५ हजार ४७४ गावांमध्ये आणि नव्याने दुष्काळ जाहीर केलेल्या रब्बीच्या गावांमध्ये कृषी कर्जवसुलीला स्थगिती देण्यात आली असून सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून खरीप हंगामासाठी टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. पण यंदा प्रथमच सरकारने रब्बी हंगामात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ही गावे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्य़ांतील आहेत
दुष्काळी गावांना देण्यात आलेल्या सवलती
जमीन महसुलात सूट, कृषीपंपांच्या चालू देयकांत ३३ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स, कृषिपंपांच्या जोडण्या खंडित न करणे अशा सवलती देण्यात येणार आहेत.
या सवलतींमुळे सुमारे ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे.

नगरमधील गावे..
* राहता, नगर, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील ४०८ गावांत
सोलापूरमधील गावे..
* द. सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला तालुक्यांमधील ६४५ गावांत