दुपदरीकरणाच्या कामादरम्यान नवीन स्थानकांची निर्मिती करणार
मध्य रेल्वेच्या हद्दीतील दुपदरीकरणाबरोबरच कोकण रेल्वेनेही आपल्या मार्गाचे दुपदरीकरण वेगाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या दुपदरीकरणादरम्यान कोकण रेल्वेच्या हद्दीत ११ नव्या स्थानकांची भर पडणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अखत्यारितील स्थानकांची संख्या ६५ वरून ७६ वर पोहोचणार आहे. या स्थानकांच्या उभारणीबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.
कोकण रेल्वे धावू लागल्यापासूनच तिच्या दुपदरीकरणाची मागणी होत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मागणीची दखल घेत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुपदरीकरण कामांचा मुहूर्त केला होता. तरी प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते. आता मात्र निविदा प्रक्रिया सुरू झाली असून मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. रोहा ते वीर या ४८.८९ किमीच्या दुपदरीकरणासाठी २९५ कोटी आणि रोहा ते थोकूर या ७४१ किमीच्या मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ७०९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मध्य रेल्वे मार्गावरील नागोठणे-रोहा या १३ किलोमीटरच्या टप्प्यात भूसंपादनही लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि कामाला जोरात सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
या मार्गावरील नव्या ११ स्थानकांची नावे आणि ठिकाणे यांबाबतची माहिती या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच जाहीर करण्यात येईल, असे कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले.

मध्य रेल्वेचा धडाका
* दिवा ते रोहा यादरम्यानचे दुपदरीकरण वेगाने सुरू. एप्रिलनंतर केवळ रोहा ते नागोठणे यादरम्यानचे १३ किलोमीटरचे दुपदरीकरण बाकी.
* दिवा ते कासू दरम्यान ७५ किलोमीटर माार्गाचे दुपदरीकरण पूर्ण.
* कासू ते नागोठणे दरम्यानच्या १३ किलोमीटर मार्गाचे काम एप्रिलपर्यंत अपेक्षित.