तरुणाईला ‘याड’ लावणाऱ्या पबजी या ऑनलाइन गेमवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील 11 वर्षांच्या अहद नियाझ याने ही मागणी केली असून यासंदर्भात त्याने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहिलं आहे.

पबजी गेममुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचं अहद नियाझ याने या पत्रात म्हटलं आहे. तसंच, या गेममुळं मुलं हिंसक होत असून त्यांच्या मनात वाईट विचार रुजत आहेत, असं त्याने पत्रात म्हटलंय. जर सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, कारण हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे असं पेशाने वकील असलेल्या अहदची आईने सांगितलं आहे.

यापूर्वी, परीक्षा जवळ आल्या आहेत त्यामुळे पबजीवर बंदी घालण्याची मागणी जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने केली होती. पुढील महिन्यांपासून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. दिवसभर पबजी खेळणाऱ्यांमध्ये या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या काळात पबजीवर बंदी घातली नाही तर अनेक मुले नापास होतील, अशी भीती व्यक्त करीत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे पबजीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.