भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील विविध भागांतून येणाऱ्या ‘भीमसागरा’च्या सोयीसाठी मध्य रेल्वेने १२ विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य मार्गावरील कुर्ला, ठाणे आणि कल्याण; तर हार्बर मार्गावरील मानखुर्द, वाशी आणि पनवेल या स्थानकांमधून दादपर्यंत आणि पुन्हा या स्थानकांपर्यंत अशा या विशेष सेवा चालवल्या जातील.
प्रवाशांनी अधिकृत तिकीट काढून या गाडय़ांमधून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. दादरहून ठाण्यासाठी रात्री १.१५ वाजता, कल्याणसाठी रात्री २.२५ वाजता आणि कुल्र्यासाठी रात्री ३.१५ वाजता गाडय़ा सुटतील; तर दादरला येणाऱ्या गाडय़ा कुर्ला, कल्याण व ठाणे येथून अनुक्रमे रात्री १२.४५, १.०० आणि २.१० वाजता रवाना होतील.
पनवेल, वाशी आणि मानखुर्दहून दादरकडे येणाऱ्या गाडय़ा अनुक्रमे १.१५, १.२० आणि ३.०० वाजता त्या त्या स्थानकांवरून रवाना होतील; तर दादरहून मानखुर्दला जाणारी गाडी २.१५ वाजता, दादर-पनवेल गाडी २.४५ वाजता आणि दादर-वाशी गाडी ३.४५ वाजता रवाना होईल. या गाडय़ा सर्वच स्थानकावर थांबणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.