मुलाच्या सुटकेसाठी तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी मुलाची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना रविवारी कल्याणमध्ये उघडकीस आली. रोहन गुचैत (१२) असे या मृत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह रविवारी पहाटे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारालगतच्या नाल्याजवळ आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.
येथील ठाणकरपाडा भागातील सुंदरनगर संकुलात उत्तमभाई गुचैत हे कुटुंबियांसह राहतात. त्यांचा रोहन हा मुलगा १७ एप्रिलपासून बेपत्ता होता. घराजवळ खेळत असतानाच रोहनचे अपहरण करण्यात आले. उत्तमभाईंनी सर्वत्र शोध घेतला परंतु रोहनचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी उत्तमभाईंना दूरध्वनी करून रोहन सहीसलामत परत हवा असल्यास ५० लाख रुपयांची खंडणी देण्याची धमकी दिली. उत्तम यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनीही ५० जणांचे पथक तयार करून सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेरीस रविवारी पहाटे रोहन याचा पत्रीपुलाजवळील कृषी उत्पन्न बाजार समितीनजीकच्या नाल्यात छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी निलेश सुधाकर साळवे (३६), इम्तियाझ अहमद अब्दुल सत्तार (४३), सैय्यद इशाक शेख (४५), गणेश पाटील (३८) या आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी सैय्यद हा गुचैत कुटुंबीयांच्या परिचयाचा होता. तो इलेक्ट्रिशिअन आहे. त्याने पत्ता दाखवण्याचे निमित्त करून रोहनच्या अपहरणाचे कृत्य केले असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कामात पोलीस गुंतून राहिल्यामुळे आपल्या मुलाच्या अपहरण प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने सुरू होता, या शब्दांत गुचैत कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मी नारायणन यांनी, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असे सांगितले.