रिपिब्लक वाहिनीचा टीआरपी कृत्रिमरित्या वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक कोटींहून अधिक पैसे स्वीकारले. यापैकी काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली, अशी माहिती एका अटक आरोपीने चौकशी दरम्यान दिल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही माहिती दंडाधिकारी न्यायालयासमोर सादर केली.

आरोपी अभिषेक कोळवडे याने रिपब्लिक वाहिनीचा टीआरपी वाढविण्यासाठी दरमहा १५ लाख रुपये मिळत. यापैकी काही रक्कम वाहिन्यांचा वितरक आशिष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली. तर काही रक्कम हवालामाध्यमातून हाती आली, अशी माहिती दिली. त्याने यातील काही रक्कम टीआरपी मोजण्यासाठी बॅरोमिटर यंत्र बसविलेल्या ग्राहकांना फितवण्यासाठी साथीदारांमध्ये वाटली. तर काही रक्कम स्वत:कडे ठेवली.

अन्य एक माफीचा साक्षीदार?

टीआरपी घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपीने वकिलांमार्फत माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. ही बाब गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयाला देऊन याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणीही केली. माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आरोपीने अटक केल्यानंतर आतापर्यंतच्या तपासास पूर्णपणे सहकार्य केले आहे.

त्याच्या चौकशीतून या घोटाळ्यात सहभागी बहुतांश सर्वच आरोपींविरोधात भक्कम पुराव्यांची मालिका उभी करणे शक्य आहे, असा दावा तपासाशी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. दरम्यान, याआधीही अन्य एका अटक आरोपीने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.