मध्य रेल्वेवर सहा महिन्यांत १५ हजार क्युबिक मीटर कचरा उचलला

रेल्वे रुळांवर येणारा कचरा, त्यामुळे होणारी अस्वच्छता आणि लोकल गाडय़ा चालवितानाही येणारा अडथळा हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. रुळांवरील कचरा उचलण्यासाठी रेल्वेकडमून विशेष गाडी चालवण्यात येते. तरीही मध्य रेल्वेला रुळांची डागडुजी करताना हाच कचरा अडथळा ठरत असल्याने कचरा काढण्यासाठी मेगाब्लॉकही रात्रीच्या वेळी घेतला जात आहे. गेल्या सहा महिन्यांत मध्य रेल्वे मार्गावरील रुळांमधून १५ बाय १० मीटरच्या जागेत असलेल्या ३० मजली इमारतीएवढा १५ हजार क्युबिक मीटर कचरा उचलण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

दिवा स्थानकाजवळील पारसिक बोगद्याजवळच एका मालगाडीचा डबा घसरल्याची घटना बुधवारी घडली. त्यामुळे ५० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आणि १०० लोकल फेऱ्या उशिराने धावल्या. ज्या ठिकाणी मालगाडीचा डबा घसरला त्या ठिकाणी रुळांवर आणि त्याच्या बाजूला मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होता. डबा घसरण्यासाठी हेच कारण तर ठरले नाही ना, याची चौकशी मध्य रेल्वेकडून केली जात आहे. मध्य रेल्वे रुळांवरील उचलण्यात आलेला कचरा मानखुर्द-वाशी आणि दिवा येथे रुळांच्या बाजूला भराव टाकण्यासाठी वापरण्यात येतो. त्यामुळे घटनेची त्या दृष्टीने चौकशी केली जात आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, भायखळा, जीटीबी नगर ते रावळी जंक्शन येथील रुळांवर मोठय़ा प्रमाणात कचरा येतो. रुळांच्या बाजूलाच असणाऱ्या इमारती आणि झोपडय़ांमधून दररोज कचरा टाकला जातो. मध्य रेल्वेने बुधवारी  कचरा विशेष लोकल चालवून ४५०० क्युबिक मीटर कचरा उपसला आहे. एका लोकलमध्ये २०० क्युबिक मीटर कचरा भरला जातो. अशा लोकलच्या सहा फेऱ्या झाल्याची माहिती, माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक सुरेंद्र कुमार जैन यांनी दिली. सहा महिन्यांत एवढा १५ हजार क्युबिक मीटर कचरा उचलण्यात आला आहे. कचरा वर्गीकरण न करताच त्याची विल्हेवाट लावून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, ऊर्जानिर्मिती करणे यासारखे उपाय सुचविणारे तंत्र शोधणाऱ्या परदेशी कंपनीशी बोलणी सुरू असल्याचेही जैन यांनी सांगितले.