मुंबईतील करोना रुग्णसंख्येत चढउतार सुरू आहे. शुक्रवारी १८७६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या पुन्हा ८१ टक्के झाली आहे, तर रुग्णदुपटीचा कालावधीही वाढू लागला आहे. मात्र उपचाराधीन रुग्णांची संख्या कधी कमी, तर कधी अधिक होते आहे.

पालिकेने गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढवली असून दिवसाला १५ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र या आठवडय़ात सरासरी १० हजार चाचण्यांपर्यंतच पालिकेला लक्ष्य गाठता आले आहे. चाचण्यांच्या तुलनेत २० टक्के अहवाल बाधित येत आहेत.

शुक्रवारी १८७६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख ९४ हजार १७७ वर गेली आहे, तर दिवसभरात ११६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १ लाख ५६ हजारांहून अधिक म्हणजेच ८१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. २८,२७३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

रुग्णवाढीचा वेग कमी होऊ लागला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही पुन्हा ६३ दिवसांवर म्हणजे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळावर आला आहे.

मुंबईतील मृतांची संख्या ८७०३ वर गेली आहे. शुक्रवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असू त्यापैकी ३० पुरुष व १८ महिला होत्या.