१९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयाने फिरोज खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सगळ्या आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. त्यामुळे शिक्षेत दया मिळवण्यासाठी फिरोजची गेल्या दोन दिवसांपासून धडपड सुरू आहे.

सोमवारी त्याने आजन्म कारागृहात ठेवा पण फासावर लटकवू नका, असा आक्रोश न्यायालयात केला होता. तर आपले वर्तन किती चांगले आहे हे दाखवण्यासाठी त्याने कारागृहातील दोन आरोपींना साक्षीदार म्हणून हजर करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. त्याची विनंती मान्यही करण्यात आली. मात्र बुधवारी त्याच्या वकिलांनी हे साक्षीदार तपासण्यास नकार दिला. परिणामी वेळ वाया गेल्याच्या कारणास्तव न्यायालयाने फिरोजला दोन हजार रुपयांचा दंड सुनावला.

आपले वर्तन किती चांगले आहे आणि कमी शिक्षा होण्यास आपण कसे पात्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी फिरोजतर्फे तळोजा कारागृहातील त्याचे आरोपी सहकारी न्यायालयासमोर हजर करण्याची विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य केल्याने बुधवारी सकाळी या दोन आरोपींना कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत न्यायालयात आणण्यात आले. मात्र त्यानंतर फिरोजच्या वकिलांनी त्यांना तपासण्यास नकार दिला. त्यावर सीबीआयतर्फे तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. या आरोपींना कारागृहातून न्यायालयात आणण्यासाठी अलिबाग न्यायालयाची विशेष परवानगी तातडीने मिळवण्यात आली होती. फिरोजच्या वकिलांच्या कृतीमुळे न्यायालयाचाही वेळ वाया गेला. शिवाय आरोपींना आणण्यासाठीचा खर्च-कष्टही वाया गेले, असेही सीबीआयतर्फे सांगण्यात आले.

डोसा, सालेमच्या शिक्षेसाठी आजपासून युक्तिवाद

  • दुसरीकडे याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले आरोपी मुस्तफा डोसा, अबू सालेम यांच्यासह पाचजणांना काय शिक्षा व्हावी यावरील युक्तिवादाला गुरुवारी सीबीआयतर्फे सुरुवात करणार आहे.