डेक्कन, पंचवटीतील पुस्तके २०० प्रवाशांनी वाचली

मुंबई : पुस्तकप्रेमींना रेल्वे प्रवासातच वाचनाचा आनंद मिळावा, यासाठी सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन आणि सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या फिरत्या ग्रंथालयाला पहिल्या दिवशी भरभरून प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत २०० पुस्तकप्रेमी प्रवाशांनी वाचनाचा आनंद घेतला. इतिहास, कथा, आत्मचरित्रांना विशेष पसंती मिळत आहे.

राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने रेल्वेच्या सहकार्याने डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरते ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुस्तकप्रेमींना प्रवासात वाचन करता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. सोमवारी या फिरत्या ग्रंथालयाचा प्रारंभ करण्यात आला.

तेव्हापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही रेल्वे गाडय़ांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना निशुल्क सेवा देत आहेत. पंचवटी आणि डेक्कन क्वीनमध्ये आतापर्यंत २०० जणांनी पुस्तके वाचली आहेत. यामध्ये ‘नॉट विदाऊट माय डॉटर’, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचे चरित्र, शोधयात्रा, बाबा आमटे यांच्यावरील पुस्तके, ‘टाटायन’, ‘श्रीमान योगी’ यांसह इतिहास, क्रीडा, कथा, चरित्र असलेली पुस्तके मोठय़ा प्रमाणात वाचली जात आहेत.

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये २७५, तर डेक्कन क्वीनमध्ये जवळपास २५० पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. नेमण्यात आलेल्या वाचनदूताकडून गाडय़ा सुटण्यापूर्वी ही पुस्तके एका ट्रॉलीमार्फत मासिक पासधारकांच्या आरक्षित डब्यात आणली जातात. डब्यातील एका बाजूला ट्रॉली उभी केल्यानंतर प्रवासी वाचनदूताकडे येऊन पुस्तक घेऊन जातात. त्या वेळी प्रवाशाचे नाव, फोन नंबर इत्यादी माहिती वाचनदूताकडून नोंदवून घेतली जाते. पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा ते वाचनदूताकडे सोपविले जाते.

पुस्तक, ट्रॉली आणि वजन

पुस्तके भरलेली ट्रॉली या दोन्ही गाडय़ांच्या डब्यांपर्यंत आणण्यासाठी वाचनदूताला मोठी कसरत करावी लागते. पुस्तकांमुळे ट्रॉलीचे वजन खूपच वाढते. स्थानकातील प्रबंधकाकडे ही ट्रॉली उभी केली जाते. गाडी सुटण्यापूर्वी आरक्षित डब्यापर्यंत ट्रॉली आणताना वाचनदूत पूर्णपणे घामाघूम होतो. त्यामुळे स्थानकातील हमालाचीही मदत घेतली जाते. त्यासाठी हमालाला पैसेही दिले जातात.

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सुरू करण्यात आलेल्या फिरत्या ग्रंथालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण १०० जणांनी विविध प्रकारची पुस्तके वाचली आहेत. तीन महिन्यांनंतर ही पुस्तके डेक्कन क्वीन गाडीत जातील आणि तेथील सर्व पुस्तके पंचवटी गाडीत येतील. त्यामुळे दोन्ही गाडय़ांतील प्रवाशांना नवीन पुस्तके वाचता येतील.

– ज्ञानेश्वर घाणेकर, वाचनदूत, पंचवटी एक्स्प्रेस