रुग्णांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत

मुंबई : मुंबईतील करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिका सर्व स्तरावर प्रयत्न करत असली तरी मोठय़ा संख्येने अनेक रुग्ण बेपत्ता होत आहेत. २४ विभागांत मिळून साधारण दोन हजार रुग्ण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मालाडमध्ये अशाच बेपत्ता ७० रुग्णांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे.

रुग्णाचा अहवाल बाधित आला की पालिकेच्या यंत्रणेकडून त्यांची शोधाशोध सुरू होते. मात्र अनेकदा दिलेल्या पत्त्यावर हा रुग्ण राहतच नसतो किंवा गावाला गेलेला असतो. तर कधी रुग्णाने दिलेला भ्रमणध्वनी क्रमांकच अस्तित्वात नसतो. अशा बेपत्ता रुग्णांची संख्या मुंबईत खूप आहे. पालिकेच्या लेखी अशा रुग्णांची नोंद बाधित म्हणून केली जाते. मात्र त्याच्यावर कुठेही उपचार सुरू असल्याची नोंद नसते ना त्याच्या मृत्यूची कुठे नोंद असते. मालाडमध्ये सध्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असून संसर्ग आटोक्यात आणण्याचा उपाय म्हणून या रुग्णांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. पी उत्तर विभाग कार्यालयाने पोलीस ठाण्याकडे अशा ७० रुग्णांची यादी दिली आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे.

यापूर्वी मुलुंडच्या इंदिरा नगरमध्येही अनेक रुग्ण घाबरून पळून गेल्याचे प्रकार घडले होते. विलगीकरण केंद्रात १४ दिवस राहावे लागेल या भीतीने रुग्ण फोन बंद करून ठेवतात, लपून बसतात, नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे जातात, असे अनुभव पालिकेच्या यंत्रणेला आले आहेत. मात्र या अशा रुग्णांमुळे संसर्ग पसरत असल्याने पालिकेने आता पोलिसांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.

याच पद्धतीने शीव- वडाळा भागातील ८० रुग्ण बेपत्ता आहेत. वांद्रे पूर्व भागातील ३५, परळ- शिवडीमध्ये ७६ लोकांचा पत्ता नाही. ३० दिवसांपर्यंत या रुग्णांचा पत्ता नाही लागला की त्यांचा समावेश बरे झालेल्या रुग्णांचा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी आम्ही आता पोलिसांची मदत घेत आहोत. यापैकी काही रुग्ण पोलीस कोठडीत आहेत. काही गावाला गेल्याचे आढळून आले आहे. एक-दोन दिवसांत आम्ही या सगळ्या रुग्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू.

– संजोग कबरे, साहाय्यक आयुक्त, पी उत्तर