संदीप आचार्य

मुंबईत करोनाचे रुग्ण दोन लाखांपर्यंत वाढले तरी रुग्णालयांत पुरेशा खाटा असतील, अशी व्यवस्था महापालिकेने केली असून जुलैअखेरीस पालिकेकडे २० हजार खाटा तयार असतील. त्यांत अतिदक्षता विभागासाठी दोन हजाराहून अधिक खाटांची व्यवस्था असेल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.

मुंबईत गुरुवारी दिवशी करोनाचे सुमारे ६० हजार रुग्ण असले तरी यातील प्रत्यक्षात रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची गरज असलेल्यांची संख्या कमी आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास पालिकेकडे आज सर्व रुग्णालयांत मिळून ११ हजार ५४८ खाटा उपलब्ध आहेत, तर नऊ हजार ५४५ रुग्ण दाखल आहेत. सुमारे १५०० खाटा रिकाम्या आहेत. अतिदक्षता विभागात खाटा मिळत नाहीत, अशी तक्रार होती; परंतु आजच्या दिवशी आमच्याकडे अतिदक्षता विभागात ११६३ खाटा असून त्यापैकी २१ खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या पाच हजार ६१२ खाटा असून आजच्या दिवशी यातील चार हजार ३१५ खाटांवर रुग्ण दाखल असून १२९७ खाटा रिकाम्या आहेत.

पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा विचार करून आम्ही जुलैअखेरीस मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी २० हजार खाटांची व्यवस्था करीत आहोत. यात अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या सध्याच्या ११६३ वरून दुप्पट झालेली असेल, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.

रुग्णांना दाखल करण्याचे व्यवस्थापन नव्याने पालिकेच्या विभाग स्तरावरील नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ापासून  चाचण्यांचे अहवाल सकाळी ७पर्यंत वॉर्डमधील नियंत्रण कक्षात येतात. तेथून रुग्णांशी संपर्क साधून  रुग्णवाहिकेमधून रुग्णाला थेट रुग्णालयात दाखल केले जाते. दुपारी १२ वाजेपर्यंत  सर्व  रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते.यासाठी सर्व प्रयोगशाळांना त्यांच्याकडील चाचणी अहवाल  पालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे चहल म्हणाले.

खाटांसाठी कुणालाही फिरावे लागणार नाही!

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग २९ दिवसांवर गेला आहे. यापुढे मुंबईत रुग्णाला रुग्णालयात खाट मिळत नाही म्हणून अथवा खाट मिळण्यासाठी फिरावे लागत आहे, असे चित्र दिसणार नाही. खासगी रुग्णालयातील खाटांव्यतिरिक्त ३० जूनपर्यंत आमच्याकडे १५ हजार खाटा तयार असतील, तर जुलैअखेपर्यंत २० हजार खाटा महापालिका रुग्णालयात असतील, यात गोरेगाव येथे तीन हजार, वांद्रे कुर्ला संकुलाता दोन हजार, डोम व रेसकोर्स येथे १४००, तर मुलुंड येथे दोन हजार आणि दहिसर येथे दोन हजार अशा दहा हजार खाटांची व्यवस्था झालेली असेल, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.