अभिनेता सलमान खानविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत बेदरकार गाडी चालवून लोकांना चिरडल्याच्या प्रकरणाची सुनावणी २९ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश यू. बी. हेजिब रजेवर असल्याने सुनावणी स्थगित करण्यात आली.
या खटल्यात सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या महानगरदंडाधिकाऱयांच्या निर्णयाविरोधात त्याने सत्र न्यायालयात याचिका दाखल केलीये. आपल्यावरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घेण्याची मागणी त्याने याचिकेमध्ये केलीये.
या प्रकरणात गेल्या सुनावणीच्यावेळीही सलमान खान न्यायालयात गैरहजर राहिला होता. त्याच्या वकिलांनी सलमानला अद्याप काही कागदपत्रे सादर करायची असल्याचे सांगून त्याला गैरहजर राहू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली होती.
सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याची पोलिसांची मागणी मान्य करीत वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग केले होते. या निर्णयाला सलमानने सत्र न्यायालयातच आव्हान दिले असून, नव्याने दाखल खटल्याची आणि आपल्या अपिलाची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणीही त्याने एका अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती.