६०-७० वर्षांचे वृद्ध ठणठणीत बरे

मुंबई : करोनाबाधितांचा आकडा रोजच वेगाने वाढत असला तरी दुसऱ्या बाजूला या आजाराला हरवून पुन्हा घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत २०२ जणांनी या आजारावर मात केली आहे. त्यात वयोवृद्ध नागरिकांबरोबरच हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्यांचाही समावेश आहे.

अंधेरी पश्चिमेला राहणाऱ्या ६९ वर्षांच्या आजी, याच भागात राहणारे ७० वर्षांचे आजोबा, मदनपुरा येथील ४५ वर्षांचे उच्च रक्तदाबाचे रुग्ण अशा अनेक जणांनी आतापर्यंत करोनाविरोधातली लढाई जिंकली आहे. दररोज आठ दहा रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. गुरुवारी या आजाराचे २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

अंधेरीत राहणाऱ्या ६९ वर्षांच्या महिलेला १० मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी दुबईचा प्रवास केला होता. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता. मात्र १४ दिवसांनी २४ मार्चला त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

डोंबिवलीत राहणाऱ्या ३६ वर्षांच्या एका पुरुषाला २८ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आधी सापडलेल्या एका रुग्णाच्या संपर्कात ते आले होते. ३० मार्चला त्यांना श्वास घेण्यासही अडथळा होत होता. मात्र पालिकेच्या डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे ते बरे झाले आणि ९ एप्रिलला त्यांना घरी पाठवण्यात आले. पालिकेच्या डॉक्टरांनी योग्य उपचार करून, चांगली सेवा सुविधा दिल्याची एक ध्वनिचित्रफीत देखील एका रुग्णाने तयार केली आहे व त्यात आपले अनुभव सांगितले आहेत. आजारादरम्यान प्रचंड ताप आणि अंगदुखी, मळमळ वाटत होती असल्याचे त्याने म्हटले आहे.

बीडीडी चाळीतील रहिवाशांनी केले स्वागत

वरळीच्या बीडीडी चाळ क्रमांक २० मधील एक जण बरे होऊन घरी परतल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी घराबाहेर येऊन टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, तर वरळी कोळीवाडा येथील जे संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते, त्यापैकी ज्यांनी आपला १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला अशा लोकांनाही घरी सोडण्यात आले आहे.