संदीप आचार्य

तंबाखू सेवनामुळे होणारा कर्करोग लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राबविलेल्या राज्यव्यापी तपासणी मोहिमेत ३० लाख लोकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तोंडाच्या कर्करोगाचे १८,६७७ रुग्ण आढळले. याच वेळी करण्यात आलेल्या महिलांच्या तपासणीत स्तनाच्या कर्करोगाचे २०७४ असे संशयित आढळले असून कर्करोगाचे एकूण २०,७५१ संशयित आढळले आहेत. ग्रामीण भागात तंबाखू सेवनामुळे क र्करोग होण्याचे प्रमाण अधिक असून या रुग्णांवर दुसऱ्या टप्प्यात लवकरच उपचाराची दिशा निश्चित केली जाणार आहे.

राज्यात वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांसह अनेक संकल्पना राबवल्या जात आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन तंबाखू सेवनविरोधी व्यापक जनजागृती मोहिमेसह कर्करोग तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता.

फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान आरोग्य विभागाने राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्य़ांमध्ये ३० लाख लोकांची कर्करोग तपासणी केली. यात तोंडाच्या कर्करोगाचे एकूण १८,६७७ संशयित आढळून आले.

तोंड उघडता न येणे, पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस असलेले व्रण, लाल व पांढरा चट्टा असणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. याच तपासणीत स्तनाच्या कर्करोगाचे रुग्णही मोठय़ा प्रमाणात आढळल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नागपूर परिमंडळात सर्वाधिक ८७२३ मुखाच्या कर्करोगाचे संशयित

पुणे परिमंडळात १८५२ संशयित रुग्ण

अकोला परिमंडळात १८२० संशयित रुग्ण

लातूर परिमंडळात १८०२ संशयित

२०७४ महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याची शंका

नागपूर परिमंडळात स्तनाच्या कर्करोगाचे ७०३ संशयित

पहिल्या टप्प्यात तोंडाच्या कर्करोगाच्या ६७४५ संशयित रुग्णांना तर स्तनाच्या कर्करोगाच्या ३०१ संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच सर्व संशयित कर्करुग्णांची तपासणी पूर्ण होऊन त्यांच्या उपचाराची दिशा निश्चित केली जाईल. या रुग्णांची जिल्हा रुग्णालये तसेच कर्करोग उपचारासाठी संदर्भित केलेल्या रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपचार योग्य प्रकारे होत आहेत अथवा नाही याची देखरेख आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाईल.

– डॉ. साधना तायडे, सहसंचालिका आरोग्य विभाग