टाटा पॉवर कंपनीची २१ लाखांची रोकड लुटणाऱ्या दोघांना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्यात कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. गेल्या १ ऑगस्ट रोजी आरोपींनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण करून तिजोरीतील रक्कम लांबवली होती.
 टाटा वीज कंपनीच्या देयकांची रक्कम स्वीकारण्याचे काम अंधेरीच्या स्मार्ट डेटा प्रोसेसिंग सव्र्हिस या कंपनीला देण्यात आले आहे. मुंबईत कंपनीची १४ सेंटर्स आहेत. देयकांची रक्कम स्वीकारून अंधेरीच्या कोलडोंगरी येथील कार्यालयात आणली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती बँकेत जमा केली जाते. १ ऑगस्ट रोजी कंपनीच्या कार्यालयात दोन अज्ञात इसम कामानिमित्त आले आणि त्यांनी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी अतुल जैन यांना मारहाण करून बाथरूममध्ये कोंडून ठेवले. या इसमांनी तिजोरीतील सुमारे २१ लाख रुपयांची रोकड पळवली होती. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी बनावट चावीने तिजोरी उघडली होती. त्यामुळे आरोपी हे कंपनीशी संबंधित असावेत असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव निंबाळकर यांनी दिली. सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केली असता संतोष बालगुडे या कर्मचाऱ्याचा त्यात सहभाग असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला कुरार येथील घरातून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून त्याचा साथीदार सुनील भगतला अटक करण्यात आली.
तिसरा आरोपी बिट्टू पांडे फरार आहे. पोलिसांनी आरोपींकडून सात लाखांची रोख रक्कम जप्त केली. बालगुडे हा याच कंपनीत काम करत असल्याने त्याला सर्व व्यवहारांची माहिती होती आणि त्याने योजना आखून ही चोरी केली, असे निंबाळकर यांनी सांगितले.