रेल्वेरूळ ओलांडताना आणखी एकाचा मृत्यू; स्थानिक संतप्त
हँकॉक पूल पाडल्यानंतर येथील रहिवाशांना रहदारीसाठी कोणताही पर्याय नसल्याने सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळून रेल्वेरूळ ओलांडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र हे धोकादायक प्रकार लोकांच्या जीवावर उठत असून बुधवारी या पुलाखाली आणखी एका प्रवाशाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त रहिवाशांनी रेल्वे रोको केला होता. मात्र अजूनही हा पूल बांधण्याचे काम निविदा प्रक्रियेतच असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
हँकॉक पुलाखालून रेल्वेरूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत हा पूल पाडल्यानंतर वाढ झाली आहे. त्यातच बुधवारी प्रमोद कुमार हा २२ वर्षीय तरुण येथून रूळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून त्याचा मृत्यू झाला. माझगाव येथे राहणारा प्रमोद एका इमारतीत रखवालदाराचे काम करत होता. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संयम दाखवत रेल्वे तसेच पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
दोन महिन्यांपूर्वी १७ फेब्रुवारी रोजी येथे गौरव व्होरा नावाच्या एका शाळकरी मुलाचा रेल्वेरूळ ओलांडताना अपघातात मृत्यू झाला होता. त्या वेळी संतप्त रहिवाश्यांनी सँडहर्स्टरोड स्थानकात रेल्वे रोको करत हा पूल तातडीने बांधण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. रेल्वे तसेच पालिका प्रशासनाचे अधिकारी व रहिवासी यांच्या बैठकीनंतर या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात येईल, अशी भूमिका घेण्यात आली होती.
मात्र दोन महिने उलटूनही पालिका प्रशासनाने त्याबाबत काहीच केलेले नाही.

निविदा प्रक्रिया सुरूच
पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता हा पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. पालिकेने निविदा मागवल्या असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यास एका महिन्याचा कालावधी लागेल. त्यानंतर येणाऱ्या प्रतिसादावर या पुलाचे बांधकाम कधी सुरू होईल आणि पूल कधी बांधून होईल हे अवलंबून असेल, असे पालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) शीतला प्रसाद ओ. कोरी यांनी सांगितले.