मुंबई : धोकादायक असलेला लोअर परळ उड्डाणपूल तोडण्याची मंजुरी पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिली आहे. पूल तोडण्याचे काम तीन महिने सुरू राहणार असून त्यासाठी छोटे-मोठे २५० ब्लॉक रेल्वेला घ्यावे लागतील.

रेल्वे, आयआयटी आणि मुंबई पालिकेने केलेल्या तपासणीत लोअर परळ स्थानकावरील उड्डाणपूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. १९२१ साली बांधलेला हा उड्डाणपूल गंजला आहे. तसेच तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती वर्तविल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल पाडण्यासाठी सात कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. पुलाच्या पाडकामासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळणे बाकी होते. ती मिळेपर्यंत पूल पाडण्याच्या काही किरकोळ कामांना सुरुवात करण्यात आली होती. आता आयुक्तांची परवानगी मिळाल्याने आता पाडकामाला गती मिळेल, असे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. हा पूल तीन महिन्यात तोडण्यात येणार असून त्यासाठी दररोज रात्री तीन तास अशा एकूण २५० तासांचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे.