परळमधील रुग्णालयात अकरा महिन्यांच्या बालिकेवर यशस्वी शस्त्रक्रिया

संदीप आचार्य, मुंबई</strong>

देशभरात जवळपास अडीच हजार बालके यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक तेवढी प्रत्यारोपण केंद्रे भारतात अस्तित्वात नाहीत. मुंबईत पाच-सहा ठिकाणी यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात, तर देशात सुमारे ३५ ठिकाणी या शस्त्रक्रिया प्राधान्याने केल्या जातात.

परळच्या ग्लोबल इस्पितळामध्ये नुकतीच ११ महिन्यांच्या बालिकेवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

डॉ. रवी मोहनका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ११ महिन्यांच्या बाळावर (वजन साडेपाच किलो) यकृताचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले. विशेष म्हणजे बाळाचा व वडिलांचा रक्तगट भिन्न होता. अशा प्रकारे यकृत प्रत्यारोपणाची पश्चिम भारतातील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

११ महिन्यांच्या हर्षिताला बायलेरी अ‍ॅट्रेसियाचे निदान झाले. सुरुवातीच्या शस्त्रक्रियेनंतरही तिचे यकृत अकार्यक्षम ठरले. त्यामुळे तातडीने तिच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. तथापि तिच्या कुटुंबातील कोणाच्याही यकृताचे नमुने जुळत नसल्यामुळे शस्त्रक्रियेस विलंब होत होता. त्यातच हर्षिताला कावीळ झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली होती. कावीळ, वजन कमी होणे, उलटय़ा होणे अशा गोष्टी होऊ लागल्यामुळे अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार करण्यात येत होते.

शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे वारंवार रक्तसंक्रमणही करावे लागत होते. सामान्यपणे कोणत्याही यकृत प्रत्यारोपणासाठी रक्तदात्याचा व रुग्णाचा रक्तगट जुळणे आवश्यक होते. मात्र हर्षिताचा व कुटुंबातील कोणाचाही रक्तगट जुळत नसल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय तिच्यासाठी अवघड दिसत होता. अशा परिस्थितीत ग्लोबल इस्पितळामधील डॉक्टरांनी भिन्न रक्तगट असतानाही यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मोठय़ा वयाच्या रुग्णांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया आम्ही केल्याचे डॉ. श्रीमल यांनी सांगितले.

एक वर्षांच्या व कमी वजनाच्या बाळावर शस्त्रक्रिया करणे हे आमच्यासाठी आव्हान होते. यासाठी हर्षिताच्या वडिलांना विश्वासात घेतले. त्यांचा रक्तगट ‘ब’ होता. त्यांच्या संमतीनंतर त्यांच्या यकृताचा छोटासा भाग काढून ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. भिन्न रक्तगटाची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे एक आव्हान असतेच. शिवाय शस्त्रक्रियेनंतरची काळजी हे दुसरे आव्हान होते. आमच्या डॉक्टरांनी ते यशस्वीपणे पेलले, असे ग्लोबल रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलावळीकर यांनी सांगितले.

आजमितीस दहा लाख बाळांमागे एक ते दोन बाळांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्याचे ‘इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. देशात अडीच हजार बालकांना यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी आवश्यक तेवढी प्रत्यारोपण करणारी केंद्रे अस्तित्वात नाहीत. यकृत प्रत्यारोपणात ९५ घटनांमध्ये नातेवाईकांकडून यकृताचे दान केले जाते, तर केवळ दहा टक्के शस्त्रक्रिया या कॅडोव्हर डोनेशनच्या माध्यमातून केल्या जातात. देशात दरवर्षी यकृत बिघाडामुळे दोन लाख लोकांचे मृत्यू होत असून यातील २५ हजार रुग्णांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो.

– डॉ. अविनाश सुपे, महापालिका रुग्णालयांचे माजी संचालक