मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत अशी तब्बल एकूण २८,६६१ पदे रिक्त असून वेळीच पदोन्नती देण्यात न आल्यामुळे रिक्त राहिलेल्या ९८१८ पदांचा त्यात समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सध्या १ लाख ४० हजार कर्मचारी कार्यरत आहे. मात्र अधिकाऱ्यांपासून कामगारापर्यंत सुमारे १८,८४३ पदे आणि पदोन्नतीची ९,८१८ पदे रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीची पत्रकारांना माहिती देण्यासाठी सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. परिचारिका, कारकून, नोंदणी सहाय्यक आदींची सुमारे ८,५०९, तर शिपाई, कामगार, वॉर्ड बॉय आदींची सुमारे ८,३४९ पदे रिक्त आहेत. परिचारिका, कारकून आदींच्या पदोन्नतीची १,३७१, तर चतुर्थश्रेणी कामगारांची पदोन्नतीची ३,७५० पदे रिक्त आहेत. त्याशिवाय मागासवर्गासाठी राखिव असलेली अधिकाऱ्यांपासून कामगारांपर्यंतची ३१८८ आणि पदोन्नतीची ६६१ पदे रिक्त असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून यावेळी देण्यात आली. रिक्त पदांमुळे पाणी खाते, घनकचरा व्यवस्थापन विभाग, रुग्णालये आदी ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत आहे.
महापालिकेतून निवृत्त होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे वारंवार पदे रिक्त होत असतात. मात्र रिक्त होणारी पदे वेळोवेळी भरण्यात येतात, असे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सातपुते यांनी दिली.