मुंबई : दुर्मीळ आजार जडलेल्या ११ वर्षीय फरहान अहमद चौधरी याच्यावर आजवर ३० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मुंबईतील साकीनाका येथे राहणाऱ्या फरहान हा जन्मापासूनच ‘ज्युवेनाईल रिकरंट रेस्पिरेटरी पॅपिलोमेटॉसिस’ या श्वसननलिकेशी संबंधित आजाराने ग्रस्त आहे. दरम्यान, त्याच्यावर भविष्यात आणखीन काही शस्त्रक्रिया करण्यात येण्याची शक्यता असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

श्वसननलिकेशी संबंधित हा आजार दहा हजारांमध्ये एकाला उद्भवतो. या आजारात फरहानच्या श्वसनमार्गात साधारणपणे तीन ते चार महिन्यांच्या अंतराने गाठ तयार होते आणि त्याचा श्वास बंद होतो. ही गाठ शस्त्रक्रियेने काढणे हाच यावर उपाय आहे. फरहान दीड वर्षांचा असताना कोहिनूर रुग्णालयातील डॉ. संजय हेलाले यांनी त्याच्यावर पहिली शस्त्रक्रिया केली होती.

त्याच्या श्वसननलिकेत गाठ असल्याने या ठिकाणाहून भूल दिली जाते. त्यामुळे ३ मिनिटे त्याला कृत्रिम श्वास दिला जातो आणि पुढची ३ मिनिटे शस्त्रक्रिया केली जाते. पुन्हा ३ मिनिटे श्वास आणि त्यानंतर शस्त्रक्रिया अशी ही प्रक्रिया जवळपास अर्धा ते पाऊण तास केल्यानंतर शस्त्रक्रिया पूर्ण होते. डॉ. हेलाले आणि भूलतज्ज्ञ डॉ. सईदा खान आणि डॉ. रत्नाकर गोसावी यांच्या पथकाने आजवर अशा २५ शस्त्रक्रिया त्याच्यावर केल्या आहेत. ३०वी शस्त्रक्रिया २१ डिसेंबर रोजी कोहिनूर रुग्णालयात पार पडली.

‘या आजारावर कोणतेही उपचार नसल्याने शस्त्रक्रियाच एकमेव पर्याय आहे. फरहानची नैसर्गिक श्वसनप्रक्रिया अबाधित ठेवून ही शस्त्रक्रिया करणे लक्ष्य असते. तो मोठा होत आहे, तसा त्याच्या दोन शस्त्रक्रियांमधील काळ वाढत आहे, हे सकारात्मक आहे.

कदाचित ३० वर्षांचा होईपर्यंत हा आजार पूर्णपणे बराही होईल. सध्या तो लहान असल्याने त्याच्या गळ्याच्या भागात ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आव्हानात्मक आहे,’ असे मत डॉ. संजय हेलाले यांनी व्यक्त केले. फरहानवर राज्याबाहेरील नामांकित रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया केली आहे, परंतु कोणताही फरक पडलेला नाही. वडील फिरोज अहमद चौधरी यांनी भारताबाहेरही यावर काही उपाय उपलब्ध आहेत का, याचा तपास केला होता.

अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही

‘शस्त्रक्रिया वगळता इतर मुलांप्रमाणे त्याचे जीवन सुरू आहे, हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. त्यालाही आता या शस्त्रक्रियांची इतकी सवय झाली आहे की, तो स्वत:हून ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. सध्या साकीनाक्यातील जरीमरी शाळेत इयत्ता ७ वीत शिकणाऱ्या फरहानला आजवर तीन वेळा शाळा बदलावी लागली. यामुळे त्याच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे. मात्र तरीही या आजारासोबत तो त्याच्या अभ्यासावरही मेहनत घेतो,’ असे फरहानचे वडील फिरोज चौधरी सांगतात.