मिशेल ओबामांच्या कोल्ड प्लेला करसवलत

जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणासाठी ४० लाखांचे भाडे वसूल करणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या सामाजिक संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्लोबल इंडिया कल्चरल फेस्टीव्हलला मात्र  ७५ टक्के करसवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ओबामा यांची ‘द ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅन्ड लिडरशीप फाऊंडेशन’ गेल्या काही वर्षांपासून भुकेल्या लोकांसाठी काम करीत असून त्यासाठी निधी उभारण्यासाठी वांद्रे- कुर्ला संकुलात होणाऱ्या कोल्ड प्लेसाठी प्रथमच नियम बाजूला सारून करसवलत देतांना केवळ २५ टक्के भाडे आकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

‘ग्लोबल सिटीझन’ या संस्थेतर्फे मुंबईत ग्लोबल इंडिया कल्चरल फेस्टीव्हलचे एमएमआरडीएच्या वांद्रे- कुर्ला मैदानात आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर होणाऱ्या या उत्सवात ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाबरोबरच बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील  कलाकारांचा कार्यक्रम बीकेसीच्या मैदानावर १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. त्यासाठी २० हेक्टर जागेची मागणी आयोजकांनी एमएमआरडीएकडे केली आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने  एक लाख पर्यटक मुंबईत येणार असून त्यातून प्राधिकरण आणि सरकारला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सुमारे १३० कोटींचा महसूल मिळेल, शिवाय एमएमआरडीएचे नाव जगभरात पोहोचेल. त्यामुळे कार्यक्रमासाठी जागा मोफत देण्याची मागणी या कंपनीने केली आहे. मात्र गेल्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘मेक इन इंडिया’चा अपवाद सोडत आजवर एकाही संस्थेस हे मैदान मोफत देण्यात आलेले नाही. त्यामुळे  केवळ ग्लोबल इंडिया कल्चरल फेस्टीव्हलला हे मैदान मोफत दिल्यास  आणि उद्या कोणी न्यायालयात गेल्यास प्रशासनाची अडचण होईल म्हणून एमएमआरडीएने या आयोजकांना संपूर्ण भाडे भरण्याचे पत्र दिले होते. सुमारे १२ कोटी रूपये भाडे आयोजकाना भरावे लागणार होते. मात्र, ही संस्था जगभरातील उपाशी लोकांसाठी काम करीत आहे. त्यामुळे भाडेमाफी द्यावी अशी मागणी संस्थेने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मात्र आजवर कोणत्याच संस्थेला अशी सवलत देण्यात आलेली नसल्याची बाब अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली. शेवटी या संस्थेकडून केवळ २५ टक्के भाडे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांने सांगितले.

  • या कार्यक्रमासाठी पाच लाखाची ५०, अडीच लाखाची १०० तर एक लाखाची २०० खास तिकीटे ठेवण्यात आली आहेत.
  • या शिवाय पाच हजार, सात हजार, १० हजार, १५ हजार, २५ हजार, ५० हजार असे तिकीटांचे दर राहणार असून काही तिकीटे मोफतही दिली जाणार आहेत.