ग्राहक मिळण्याची शक्यता कमी

मुंबई : राज्यातील हॉटेल ग्राहकसंख्येच्या निर्बंधांसहित सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यानंतर अनेक हॉटेलचालकांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली असून बुधवारपासून ४० टक्के  हॉटेल सुरू होण्याची अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्या इतर पूरक उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद सुरुवातीस मर्यादितच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निर्बंधासहित मर्यादित ग्राहकसंख्येत हॉटेल सुरू करण्याची मागणी रविवारी ‘फेडरेशन फॉर हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरन्टस इंडिया’ (एफएचआरएआय) आणि अन्य संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर सोमवारी शासनाने ३३ टक्के  ग्राहक संख्येच्या मर्यादेत हॉटेल सुरू करण्यास मुभा दिली. बुधवारी हॉटेलचालकांनी व्यवसायाची पुन्हा सुरुवात करण्याची तयारी केली आहे.

सध्या मुंबईसारख्या काही शहरांमधील हॉटेल हे वैद्यकीय व सरकारी कर्मचारी यांच्या निवासासाठी, तसेच काही परदेशातून आलेल्या प्रवासासाठी अलगीकरणासाठी कार्यरत आहेत. अशी हॉटेल्स सध्या कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे पुरेशा सुविधा असून ती त्वरित इतर ग्राहकांसाठीही उपलब्ध होऊ शकतील, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुंबई आणि काही मोठय़ा शहरांतील पंचतारांकित आणि इतर मोठय़ा हॉटेल्सचा यांमध्ये समावेश आहे. मात्र मध्यम स्वरूपांच्या हॉटेलमध्ये काही प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी कर्मचारी सध्या आपल्या मूळ गावी गेले असल्याने त्यांची उपलब्धता होण्यास वेळ लागेल, मात्र आठवडाभरात ती कमतरता भरून निघेल, अशी अपेक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरबक्षिशसिंह कोहली यांनी सांगितले. मात्र ग्राहक संख्यादेखील मर्यादितच ठेवायची असल्याने या अडचणीवर लवकरच मात करता येईल, असे त्यांनी नमूद के ले.

सध्या प्रवास सुविधा, कॉर्पोरेट कार्यालये हॉटेलशी निगडित पूरक उद्योग अत्यंत मर्यादित स्वरूपात सुरू आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा प्रतिसाद हा खूपच मर्यादित असण्याची शक्यता फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी सांगितले. विशेषत: हवाई प्रवास आणि पर्यटन यावरील निर्बंध कमी होतील तसा व्यवसायास वेग येईल, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

रेस्टॉरन्ट असोसिएशनची सावध पावले

हॉटेलना परवानगी मिळाली असली तरी उपाहारगृहांमध्ये (रेस्टॉरन्ट) ग्राहकांना प्रवेशाची परवानगी नसून फक्त घरपोच आणि पार्सल सुविधांनाच मुभा आहे. आहार, एफएचआरएआय या संघटनांनी रेस्टॉरन्टनाही निर्बंधासहित परवानगी द्यावी, अशी मागणी केली असली तरी नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत सावधगिरीची भूमिका मांडली आहे. हा आरोग्याचा प्रश्न असून याबाबत तज्ज्ञ जे मत मांडतील, ते आम्ही स्वीकारू, असे असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी सांगितले.

निवासी हॉटेल सुरू करण्यास परवानगी

मुंबई : राज्य सरकारच्या ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ अभियानाअंतर्गत निवास व्यवस्था असलेली हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस बुधवार, ८ जुलैपासून अटीसापेक्ष सुरू करण्याच्या आदेशांची मुंबईत अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक मुंबई महापालिका आयुक्तांनी मंगळवारी जारी केले.राज्य सरकारने करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणची निवासी हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सामाजिक अंतर नियमाचे पालन आणि एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षेत्र वापराची परवानगी निवासी हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसना देण्यात आली आहे. करोनासंदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी यांची सविस्तर माहिती हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.