एकीकडे अतिपोषणामुळे लठ्ठ मुलांची समस्या उच्चभ्रू वर्गात दिसून येत असताना महानगरातील गरीब वस्त्यांमध्ये सहा वर्षांपर्यंतची पन्नास टक्के मुले कुपोषित असल्याचे क्राय संस्थेच्या पाहणीत आढळून आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून २००६ मध्येही याच प्रकारची आकडेवारी समोर आली होती. मात्र त्यानंतर कुपोषित मुलांसाठी अनेक प्रकल्प राबवूनही या परिस्थितीत फरक पडला नसून कुपोषित मुलांची संख्या वाढल्याचेच दिसून आले.
चिल्ड्रन राइट अ‍ॅण्ड यू (क्राय) या संस्थेने मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर आणि चेन्नई या पाच महानगरांमधील गरीब वस्तीमधील सहा वर्षांपर्यंतच्या १२६० मुलांच्या आरोग्याचा अभ्यास केला. यात मुंबईतील २९७ बालकांचे आरोग्य तपासण्यात आले. या पाहणीनुसार मुंबईतील गरीब वस्तीमधील ४१.३ टक्के बालके कुपोषित आहेत. चेन्नईमध्ये हे प्रमाण ६२ टक्के असून दिल्लीत ५० टक्के, कोलकातामध्ये ४९ टक्के तर बंगलोरमध्ये ३३ टक्के बालकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. मुंबईतील कुपोषित बालकांमध्येही ५६ टक्के ही अत्यंत कुपोषित असून ४४ टक्के ही मध्यम स्वरूपाच्या कुपोषणाने त्रस्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे या बालकांच्या पालकांना त्याची फारशी माहिती नाही. कुपोषण कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या जीवनसत्त्व ‘अ’च्या गोळ्या केवळ ८० टक्के मुलांपर्यंत पोहोचतात. ७२ टक्के मुलांना जंतावरचे औषध देण्यात येते तर केवळ ६० टक्केमुलांना लोहाच्या गोळ्या दिल्या जातात.
अंगणवाडय़ांमध्ये या बालकांच्या आरोग्याची नियमितपणे माहिती घेऊन त्याबाबत आईला समुपदेशन करणे तसेच पोषण आहार देणे आवश्यक आहे. अंगणवाडय़ांमध्ये मुले पाठवणे पालकांना सुरक्षित वाटत असले तरी मुलांच्या आरोग्याबाबत येथे फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, असे क्रायच्या प्रतिनिधींनी सांगितले. अंगणवाडय़ांमध्ये उंची मोजण्याचे साधन नसल्याने कुपोषित मुलांची संख्या केवळ वजनानुसारच ठरवली जाते. केवळ ३६ टक्के अंगणवाडय़ांमध्ये दर महिन्याला नियमित तपासणी होते. तर ३७ टक्के अंगणवाडय़ांमध्ये गेल्या सहा महिन्यांचीही नोंदणी आढळली नाही. अंगणवाडय़ांकडून पालकांनाही बालकांच्या आरोग्याविषयी योग्य पद्धतीने माहिती दिली जात नाही. ४२ टक्के अंगणवाडय़ांमध्ये वजन मोजल्यावर पालकांना सांगितले जाते. २७ टक्के अंगणवाडय़ांमध्ये पालकांनी विचारल्यावर माहिती दिली जाते तर ३१ टक्के अंगणवाडय़ांकडून माहितीच दिली जात नाही. अर्थात अंगणवाडय़ांमधील वातावरण सुरक्षित व मुलांसाठी योग्य असल्याचे मुंबईतील ९८ टक्के पालकांना वाटते. ७१ टक्के मुलांना अंगणवाडीत जायला आवडते तर ९३ टक्के पालकांना अंगणवाडी सुरक्षित वाटतात. त्यामुळे अंगणवाडय़ांमधून बालकांच्या आरोग्याविषयी अधिक प्रमाणात काळजी घेणे शक्य असून त्यासाठी अंगणवाडीच्या क्षमता वाढवण्याची गरज आहे.

जन्मनोंदणी – मुंबईत १०० टक्के जन्मनोंदणी होत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत असला तरी प्रत्यक्ष पालकांशी बोलल्यावर मुंबईच्या गरीब वस्तीतील तब्बल ३२ टक्के मुलांच्या जन्माची नोंद होत नसल्याचे पुढे आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार मुंबईतील गरीब वस्त्यांमध्ये ६९ टक्के मुलांचे लसीकरण होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र क्रायच्या पाहणीनुसार तीन वर्षांखालील केवळ ४८ टक्के मुलांना एखाद्या प्रकारचे लसीकरण करण्यात आले आहे.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार