मुंबई : करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. परिणामी सोमवारी एकाच दिवसात शहरात नियम धुडकावणाऱ्यांविरोधात २९२ गुन्हे नोंदवत ४५० जणांना बेडय़ा ठोकल्या.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टाळेबंदीसह जमावबंदी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य बाजारपेठ बंद राहील. अत्यावश्यक सेवेशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवास करता येणार नाही. त्याशिवाय आरोग्य अधिकाऱ्यांनी करोनाबाधित, संशयित रुग्णांना दिलेल्या सूचना पाळणेही बंधनकारक असेल. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात २० मार्चपासून पोलिसांनी कारवाई सुरू के ली.  दक्षिण मुंबईतील पायधुनी, जेजे मार्ग, डोंगरी आदी पोलीस ठाण्यांनी नागरिक रस्त्यांवर उतरूच नयेत, अशी उपाययोजना के ली. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. गस्त वाढविण्यासोबत जनजागृती सुरू केली. ही व्यवस्था भेदून विनाकारण रस्त्यांवर उतरलेल्या नागरिकांविरोधात गुन्हे नोंदवण्याचा धडाका पोलिसांनी सुरू केला आहे.