अतिदुर्गम म्हणून ओळखल्याा जाणारा जव्हार तालुक्यात आरोग्य विभागाने विशेष भरीव काम करून प्राथमिक आरोग्य केंद्रावर शिबिरे आयोजित करून कोरोनाकाळात आतापर्यंत तालुक्यातून ५५५ कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टातुलनेत १२० टक्के यश प्राप्त झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात जामसर, साखरशेत, नांदगाव आणि साखरा यांचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्रे तालुक्यात आहेत. ग्रामीण आदिवासी भागात लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड होता परंतु आरोग्य विभागाच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया या उपक्रमासाठी केलेल्या प्रयत्नातून लोकसंख्या वाढीस लगाम लावण्यात यश प्राप्त होऊ लागला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शिबिर आयोजित करून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या, यामध्ये आरोग्यसेविका यांनी मोठी जोखीम पत्करली असून प्रवर्तक म्हणून त्यांना प्रति शस्त्रक्रिया मानधनही देण्यात आले आहे. शिवाय पुरुष अथवा स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांनादेखील प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे.

कुटुंब कल्याण शिबिरे रविवारी आयोजित केल्याने आरोग्य विभागाने रविवारीदेखील सुट्टी न घेता काम केले आहे, या शस्त्रक्रियांमुळे कुटुंब मर्यादित राहून कुपोषण वाढीस आळा बसणार आहे, शिवाय बाल मृत्युदरदेखील कमी होणार आहे. दरम्यान, पालघर येथील कांता रुग्णालयाचे डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी शस्त्रक्रिया केल्या असून ३०० लाभार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ब्लँकेटचे वाटपही करण्यात आले आहे. समता फाऊंडेशन यांच्याकडून रुग्ण लाभार्थी यांना निवासस्थानापासून शिबिर ठिकाणापर्यंत आणि पुन्हा निवासस्थानपर्यंत मोफत वाहनाची उपलब्धता करून दिली आणि इतर आवश्यक वस्तूंची मदतही करण्यात आली आहे.

जव्हारसारख्या अतिदुर्गम भागात काम करीत असताना प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागत असते, विशेष म्हणजे कोरोनाकाळातही जव्हार तालुका आरोग्य विभाग यंत्रणा अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे.

– डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार