सौरभ कुलश्रेष्ठ, मुंबई : राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी गावोगावी जलसाठे निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या योजनेमुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील १३ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून पाणी पुरवण्यासाठी लागणाऱ्या टॅंकरची संख्या ६१४० वरून यावर्षी अवघ्या १५२ टॅंकरवर आली.

राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंवर्धनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार ही व्यापक योजना सत्तेवर आल्यावर हाती घेतली. २०१५ मध्ये सुरू झाली तेव्हापासून जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी योजना म्हणून ओळखली जाते. गेल्या तीन वर्षांत १६ हजार ५२१ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यातून २२ लाख ७४ हजार ७४४ हेक्टर क्षेत्राची सिंचन क्षमता असणारे पाणीसाठे निर्माण झाले.

जलयुक्त शिवारमुळे गावागावांमधील पाणीटंचाई आटोक्यात आल्याने टॅंकरची संख्या घटण्यासही मोठा हातभार लागला आहे. २०१५ च्या उन्हाळ्यात राज्यात ६१४० टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू होता. त्यावर्षी पावसाळ्यात जलयुक्त शिवारमध्ये पाणीसाठे तयार होऊ लागल्यानंतर हे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली. २०१६ मध्ये टॅंकरची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होऊन १३७९ पर्यंत खाली आली. तर २०१७ मध्ये ती ३६६ वर आली. यंदा २०१८ मध्ये मे महिनाअखेरीस यंदाच्या उन्हाळ्यात लागलेल्या टॅंकरचा आढावा घेतला असता अवघ्या १५२ टॅंकरद्वारे राज्यात पाणी पुरवण्यात आल्याची आकडेवारी समोर आल्याचे सांगण्यात आले.

जलयुक्त शिवारमुळे राज्यातील १३ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. या योजनेत आतापर्यंत ७२५८ कोटी रुपये खर्च झाले असून लोकसहभागातून ६३० कोटी रुपये गोळा झाले होते.