राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या चौदा हजार जागांसाठी यंदा ६२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जागांच्या तुलनेत आलेल्या अर्जाची संख्या जास्त असली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्ज घटले आहेत.

शेतकी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद गेल्या काही वर्षांपासून वाढतो आहे. शहरी विद्यार्थ्यांची पावलेही या अभ्यासक्रमांकडे वळू लागली आहेत. गेल्या काही वर्षांपासून या अभ्यासक्रमांकडे झुकलेला विद्यार्थ्यांचा कल यंदाही दिसत आहे. यंदा कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी १४ हजार ५७७ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ६२ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश अटीतटीचा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मात्र यंदा तीन टक्क्यांनी अर्ज घटले आहेत.

बारावीचा घटलेला निकाल आणि विज्ञान विषयांमध्ये किमान गुणांच्या पात्रतेची अटही पूर्ण होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या याचा परिणाम या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवरही दिसत आहे. गेल्यावर्षी कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्यात ६४ हजार ६१९ अर्ज आले होते.