डोंबिवलीजवळील शिळफाटा रस्त्यावरील दावडी नाका येथील मयूर बार आणि रेस्टॉरण्टवर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून ६२ बारबाला, ४२ ग्राहकांना अटक केली. बारमधून ५० हजार रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक मानपाडा पोलिसांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्याच आठवडय़ात ‘लोकसत्ता’ने एमआयडीसी, शिळफाटा परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बार, हॉटेल्स उभी राहत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. बीअर बार, हॉटेल्सच्या पाठीमागील बाजूला लॉजिंग व बोर्डिग सुरू करून हॉटेलचालक गैरप्रकार करीत असल्याच्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आहेत. मयूर बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. तेथे अनेक गैरधंदे सुरू असतात, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांना मिळाली होती. स्थानिक पोलिसांचा या सर्वच बीअर बारना आशीर्वाद असल्याने आणि मोठा ‘चंदा’ या भागातून जमा होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या छाप्याविषयी मुंबई पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती. कारवाईनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात या सर्वाविरुद्ध गुन्हे दाखल झाले.