अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या स्थितीत सुधारणा

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम महाविद्यालयांसमोर प्रवेशोत्सुकांच्या रांगा वाढत असल्या तरी प्रत्यक्षात रोजगारसंधी घटत असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

राज्यातील जवळपास ७० टक्के पदवीधारकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या  रोजगारसंधी वाढल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्राधान्य असलेल्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील पदवी, पदव्युत्तर पदवीधारकांना नोकऱ्यांसाठी वणवण फिरावे लागत आहे. अभियंत्यांच्या नोकरीच्या संधींमध्ये घट होत असल्याचे दिसू लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा मोर्चा औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाकडे वळला. मात्र या विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांपैकी ३० ते ४० टक्केच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाल्याचे समोर आले आहे. एकीकडे पदवीधारकांची संख्या दरवर्षी वाढते आहे आणि त्याच वेळी नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याचे दिसत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत महाविद्यालयांतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना मिळालेले रोजगार (प्लेसमेंट्स) यांची माहिती गोळा करण्यात येते. कॅम्पस मुलाखती किंवा इतर माध्यमातून महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी मिळाली त्याची माहिती महाविद्यालयांनी द्यायची असते. त्यानुसार औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम महाविद्यालयांनी मे अखेरीस नोंदवलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीपेक्षा (२०१७-१८) यंदा (२०१८-१९) नोकरी मिळालेले पदवीधर घटले आहेत.

राज्याप्रमाणेच देशपातळीवरही नोकऱ्या कमी झाल्या आहेत. राज्यात २०१७-१८ मध्ये पदवी उत्तीर्ण झालेल्या ८ हजार ९८८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार १४८ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला तर यंदा म्हणजे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत २ हजार ९७६ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. यंदा १० हजार विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतील असा अंदाज आहे. पदविका पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या वर्षी २ हजार ३९७ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली होती, यंदा २ हजार ४१७ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या नोकऱ्या वाढल्या

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील रोजगार घटल्याचे दिसत असताना गेली काही वर्षे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत असल्याचे चित्र यंदा काहीसे बदलले आहे. राज्यात आणि देशपातळीवरही रोजगार मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका घेतल्यानंतर नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. उत्तीर्णाची संख्या घटत असताना नोकरी मिळवणाऱ्यांची संख्या वाढते आहे. व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमबीए) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही चांगले दिवस आल्याचे दिसत आहे.

नोकरी मिळालेले राज्यातील विद्यार्थी (कंसात उत्तीर्ण विद्यार्थी)

औषधनिर्माणशास्त्र

पदवी :

२०१६-१७ : २८५३ (८१६६)

२०१७-१८ : ३१४८ (८९८८)

२०१८-१९ : २९७६ (-)

पदव्युत्तर:

२०१६-१७ : १४१२ (२५२५)

२०१७-१८ : १२६४ (२३३१)

२०१८-१९ : ११०२ (-)

पदविका :

२०१६-१७ : २०४३ (८४९३)

२०१७-१८ : २३९७ (८९७२)

२०१८-१९ : २४१७ (-)

अभियांत्रिकी पदवी :

२०१६-१७ : ३९,१६४ (१,२१,१८६)

२०१७-१८ : ३९,८८२ (१,१६,०६८)

२०१८-१९ : ४४,८४५ (-)

पदव्युत्तर:

२०१६-१७ : १७२७ (८४४३)

२०१७-१८ : १४७८ (५९५३)

२०१८-१९ : १६३४ (-)

पदविका :

२०१६-१७ : १०,६१० (६५,१८६)

२०१७-१८ : ११,५९२ (५८,५९२)

२०१८-१९ : १४,५२३ (-)

व्यवस्थापन पदव्युत्तर :

२०१६-१७ : १८,७२६ (२७,९५०)

२०१७-१८ : १८,८०५ (२७,७२०)

२०१८-१९ : १९,३७० (-)