३२ फेऱ्यांची वाढ

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर एसटीने नवीन ८ शिवनेरी बसगाडय़ा शुक्रवारीपासून सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या ३२ नव्या फेऱ्यांची भर पडणार आहे. तसेच आगामी काळात आणखी १२ बसेसची भर पडणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

शिवनेरी बसच्या तिकीट दरात  कपात केल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. तिकीट दरात कपात केल्यामुळे एका महिन्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजे २१ हजार प्रवाशांची वाढ झाली आहे, असे एसटीने सांगितले आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एसटी महामंडळाने मुंबई-पुणे मार्गावर नवीन २० बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ८ बस शुक्रवारी दाखल झाल्या. सध्या मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी बसच्या दररोज २७२ फेऱ्या होतात. त्यामध्ये वाढ होऊन आता दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट अशा विविध मार्गावर शुक्रवारपासून ३०४ फेऱ्या दररोज होतील. एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा शिवनेरी बस सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना होणार असून मुंबई-पुणे प्रवास जलद आणि आरामदायी होणार आहे. तसेच वाढलेल्या फेऱ्यांचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.