दक्षिण मुंबईत एकूण रुग्णसंख्येच्या ८५ टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीतील

प्रसाद रावकर, इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : धारावीसह उपनगरांतील चाळी, म्हाडा इमारती, झोपडपट्टय़ांमध्ये सुरुवातील कहर करणाऱ्या करोनाने आता बहुमजली इमारती आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये घरोबा केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती, झोपु, म्हाडाच्या इमारती आणि चाळींच्या तुलनेत टोलेजंग इमारतींमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याचे एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने बहुमजली टॉवर्सवर लक्ष केंद्रित केले आहे.

दक्षिण मुंबईमधील गिरगाव, मलबार हिल, नेपिअन्सी रोड, पेडर रोड, ग्रॅण्ट रोड, ताडदेव आणि आसपासच्या परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘डी’ विभागाने या परिसरात सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात पोलीस, पालिका कर्मचारी, सरकारी कर्मचारी आदींच्या वसाहती, म्हाडा-झोपु इमारतींबरोबरच टोलेजंग इमारतींमधील रुग्णसंख्येचाही अभ्यास करण्यात आला. ‘डी’ विभागातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत झोपडपट्टी, चाळींमध्ये पाच ते सहा टक्के, सरकारी, पालिका, झोपडपट्टी पुनर्वसन आणि म्हाडा वसाहतींमध्ये १२ ते १५ टक्के करोनाबाधित आढळून आले तर बहुमजली इमारतींमध्ये ८० टक्क्यांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले. पालिकेने बहुमजली इमारतींमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. मोठय़ा सोसायटय़ांमध्ये घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वास्तव्यासाठी सामायिक जागा उपलब्ध करण्यात येते. या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे.

काही कर्मचारी बाहेरगावी जाऊन आले आहेत, तर काही जण घरात लागणारे वाणसामान आणण्यासाठी बाजारात जात-येत असतात. सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होत नसल्याने त्यांना करोनाची बाधा झाली असावी, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘डी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी बहुमजली इमारतींमधील पदाधिकाऱ्यांची दूर दृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक आयोजित केली होती. या बैठकीत १६७ सोसायटय़ांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सोसायटय़ांमध्ये होणाऱ्या बैठका, सामायिक ठिकाणी वास्तव्य करणारे कर्मचारी, मुखपट्टी-सॅनिटायझरचा वापर करावा, निर्जंतुकीकरण आदींबाबत पालिका अधिकाऱ्यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

१५४ बहुमजली इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळले असून तिथे जनजागृती आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग

प्रतिबंधित क्षेत्रे

दिनांक         इमारती          झोपडपट्टय़ा

१ सप्टें.          ६२९३              ५७७

११ सप्टें.       ७२१७               ५४२

 

५४२ प्रतिबंधित झोपडपट्टय़ांची संख्या

३४ लाख प्रतिबंधित झोपडपट्टय़ांमधील लोकसंख्या